नवी मुंबईत : खारघर येथील मोबाइल शॉपमध्ये चोरीप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून ४५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरी केलेले मोबाइल परराज्यात मागणीनुसार पाठवले जाणार होते.
खारघर येथे मोबाइल शॉप फोडल्याचा गुन्हा ३० आॅगस्टला घडला होता. गॅस कटरने शटर कापून दुकान लुटण्यात आले होते, तर गुन्ह्यानंतर त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीच्या डीव्हीआरही चोरण्यात आला होता. यामुळे गुन्हेगारांची माहिती पोलिसांना कळू शकलेली नव्हती. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने खारघर पोलीस व गुन्हे शाखा पोलीस तपास करत होते. या गुन्ह्यात ५० लाखांच्या जवळपास मोबाइल चोरीला गेले होते. त्यानुसार, गुन्हे शाखा उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, गुन्हे शाखा प्रभारी उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक एन.बी. कोल्हटकर, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर, राजेश गज्जल, नीलेश तांबे, संजय पवार, पोपट पावरा, विष्णू पवार, सचिन घनवटे, विजय पाटील आदींचे पथक तयार करण्यात आले होते.
गॅस कटरने शटर कापून घरफोडी झाल्याच्या कुर्ल्यामधील एका गुन्ह्याचा आढावा वरिष्ठ निरीक्षक कोल्हटकर यांनी घेतला. यावेळी समोर आलेल्या माहितीच्या आधारे काही संशयितांची नावे समोर आली. त्या आधारे मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून तिघांना अटक करण्यात आली. शफिकउल्ला उर्फ सोनू अतिकउल्ला (२४), अयान उर्फ निसार उर्फ बिट्टू रफी अहमद शेख (२८) व इम्रान मोहम्मद उर्फ इम्मू बिंदू अन्सारी (२५) अशी त्यांची नावे आहेत.
शफिकउल्ला हा टोळीचा म्होरक्या असून, तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांचे चोरीचे मोबाइल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी त्यांनी कुर्ला येथून एक कार चोरली होती. याच कारमधून गॅसकटर घेऊन ते खारघर येथे आले होते, अशी माहिती पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहआयुक्त जय जाधव, उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त विनोद चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक एन.बी. कोल्हटकर आदी उपस्थित होते.