पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची मॉक ड्रिल ;32 रूग्णालयांना दिल्या भेटी
By वैभव गायकर | Published: April 10, 2023 06:14 PM2023-04-10T18:14:44+5:302023-04-10T18:15:09+5:30
नागरिकांनी कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांसाठी महापालिकेच्यावतीने सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांसाठी आरटीपीसीआर चाचण्या व ॲण्टीजन चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पनवेल: राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या सूचनेनूसार आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानूसार पनवेल महापालिका क्षेत्रातील 32 खाजगी रूग्णालये व महापालिकेच्या कोविड समर्पित रूग्णालयांतील उपाययोजनांची पाहणी अर्थात ‘मॉक ड्रील’( संकट कालीन बचाव प्रशिक्षण) महापालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आले.
कोराना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती वैद्यकिय आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेश पंडित, डॉ.भक्तराज भोईटे यांनी पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर येथील एकुण 32 खाजगी रूग्णालये तसेच कळंबोली येथील महापालिकेच्या कोविड समर्पित केंद्राची पाहणी केली. याठिकाणी आरोग्य सुविधांची उपलब्धता, अलगीकरण खाटांची क्षमता, आयसीयू व ऑक्सीजन सुविधायुक्त खाटा, व्हेटिंलेटर खाटा,ऑक्सीजन सिलेंडर, ऐनवेळी लागणारी औषधे, इंजेक्शन्स, पीपीई किट, जनरल बेड्स, मनुष्यबळ ,यंत्रसामुग्री या सर्वांची पहाणी करण्यात आले.
तसेच नागरिकांनी कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांसाठी महापालिकेच्यावतीने सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांसाठी आरटीपीसीआर चाचण्या व ॲण्टीजन चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे, श्वसनास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर कोविड चाचणी करावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
नागरिकांनी सौम्य लक्षणे असल्यास कोविडचा प्रसार इतरांना होऊ नये म्हणून कार्यालयात, शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी , गर्दीच्या ठिकाणी , सार्वजनिक ठिकाणी न जाता पूर्ण बरे होई पर्यंत स्वतः घरी अलगीकरणात राहावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी,असे आवाहन पालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.