कोकण भवन प्रशासकीय इमारतीत मॉकड्रील
By कमलाकर कांबळे | Published: December 5, 2023 07:45 PM2023-12-05T19:45:52+5:302023-12-05T19:46:00+5:30
याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी आणि कोकण भवनमधील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
नवी मुंबई : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या सीबीडी बेलापूर येथील कोकण भवन या प्रशासकीय इमारतीत विविध विभागांची कार्यालये आहेत. या कार्यालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी इमारतीच्या आवारात संकटकालीन बचाव प्रशिक्षण अर्थात मॉकड्रील आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी आणि कोकण भवनमधील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. कोकण भवन प्रशासकीय इमारतीत सात मजले आहेत. यात राज्य सरकारच्या विविध विभागांची कार्यालये व दालने आहेत. त्यानुसार येथे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्याही तितकीच मोठी आहे. कोणत्याही कारणामुळे या इमारतीत आगीची दुर्घटना घडल्यास किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास त्याला कशाप्रकारे सामोरे जाता येईल, याची चाचपणी करण्याच्या दृष्टीने या मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आले होते.
कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकाराने आणि नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सहकार्याने हे आपत्कालीन प्रशिक्षण सत्र राबविण्यात आले. याप्रसंगी कोकण विभागाचे उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त (सामान्य) अजित साखरे, अग्निशमन केंद्राचे अधिकारी जगदीश पाटील, तहसीलदार माधुरी डोंगरे आदींसह कोकण भवनमधील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.