नवी मुंबई : हॉटेलमध्ये दहशतवादी घुसल्याच्या चर्चेने गुरुवारी तुर्भेत चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांसह सर्वच आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अखेर शीघ्र कृती दल व तुर्भे पोलीस यांच्या वतीने हे मॉकड्रिल असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.तुर्भे येथील आयबीआयएस हॉटेलमध्ये संशयित दहशतवादी घुसल्याची चाहूल काही प्रत्यक्षदर्शींना लागली. काही क्षणात ही माहिती संपूर्ण परिसरात पसरली. त्यामुळे या दहशतवाद्यांचा खातमा करण्याच्या उद्देशाने शीघ्र कृती दल, तुर्भे पोलीस यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहून बघ्यांची गर्दीही वाढली होती. अखेर शीघ्र कृती दलाने नियोजनबद्धरीत्या त्या संशयित दहशतवाद्यांना पकडून बाहेर आणल्यानंतर हे मॉकड्रिल असल्याची घोषणा केली. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. मॉकड्रिलच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सक्षम असल्याचा विश्वास पटवून देण्यात आला. आपत्काळात आपली यंत्रणा सक्षम असल्याचे चित्र यावेळी उपस्थितांना पहायला मिळाली. मात्र, त्यानंतरही संध्याकाळपर्यंत सोशल मीडियावर तुर्भेत दहशतवादी घुसल्याची चर्चा सुरूच होती. (प्रतिनिधी)
तुर्भेतील हॉटेलमध्ये मॉकड्रिल
By admin | Published: March 31, 2017 6:38 AM