मॉकड्रीलमुळे खारघरमध्ये अफवांना उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:28 AM2017-08-11T06:28:09+5:302017-08-11T06:28:09+5:30
आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना राबवाव्यात याकरिता पोलीस व सुरक्षा दलाच्या वतीने मॉकड्रील करण्यात येते.
पनवेल : आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना राबवाव्यात याकरिता पोलीस व सुरक्षा दलाच्या वतीने मॉकड्रील करण्यात येते. नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या ठिकाणी मॉकड्रील केले जाते. खारघरमध्ये गुरुवारी येथील डीमार्टमध्ये मॉकड्रील करण्यात आले. मात्र उपस्थितांना यासंदर्भात काहीच माहीत नसल्याने काही काळातच शहरात अफवांचे लोन पसरले. डीमार्टमध्ये आतंकवादी घुसले, शहरात आतंकवाद्यांनी हल्ला केलाय, आतंकवाद्यांनी नागरिकांना ओलीस ठेवले असल्याच्या अफवांनी जोर धरला होता.
गुरु वारी सकाळी ११.३० वाजता मॉकड्रीलला सुरु वात झाली. डीमार्टमधील नागरिकांना कोणत्याही प्रकाराची माहिती न देता डीमार्टचे शटर अचानक बंद करण्यात आले. यावेळी बंदूकधारी शीघ्र कृती दलाचे कमांडो, पोलीस अधिकारी, बॉम्ब स्कॉड, अग्निशमन कर्मचाºयांनी डीमार्टमध्ये शिरकाव करीत काही संशयितांना बाहेर काढले. या प्रकाराची काहीच माहिती नसल्याने घाबरलेल्या नागरिकांनी आपल्या घरी, मित्रांना यासंदर्भात फोनवरून माहिती देत खारघरमध्ये आतंकवादी घुसल्याचे सांगितले. तसेच पोलिसांचा फौजफाटा, कमांडोचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने झपाट्याने ही बातमी सर्वत्र पसरल्याने शहरात अफवांना उधाण आले. जवळजवळ दीड तास चाललेल्या या मॉकड्रीलची सांगता दुपारी १ च्या सुमारास झाल्याने उपस्थितांना याबद्दल माहिती दिल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सुरक्षेसंदर्भात पोलीस यंत्रणेसह इतर यंत्रणा किती सतर्क आहेत याकरिता मॉकड्रीलचे आयोजन करण्यात येत असल्याचे खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी सांगितले. खारघर पोलीस ठाण्याच्या वतीने या मॉकड्रील करण्यात आले.