उरण परिसरात दंगा काबू पथकाकडून मॉकड्रिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 01:29 AM2019-11-09T01:29:18+5:302019-11-09T01:29:28+5:30
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन : अयोध्येतील जमीनमालकीच्या वादावर निकाल अपेक्षित
उरण : येत्या काही दिवसांमध्ये अयोध्येतील जमीनमालकीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उरण पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी सकाळी चारफाटा एसटी स्थानक परिसरात संयुक्त दंगा काबू
योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.
दंगा काबू योजनेमध्ये मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून जमाव जमल्याबाबतचा विषय घेण्यात आला होता. दंगा काबू योजनेमध्ये सहा. पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे यांच्या निरीक्षणाखाली उरण पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी, ११- सपोनि / पोउपनिरीक्षक व ५० पोलीस कर्मचारी, न्हावाशेवा पोलीस ठाण्यातील एक सपोनि व तीन पोलीस कर्मचारी ओएनजीसी, सिडको फायर ब्रिगेड अधिकारी, कर्मचारी, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरणचे डॉक्टर व कर्मचारी, आरसीपी नवी मुंबईचे एक पोलीस उपनिरीक्षक व २३ पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. दंगा काबू योजना शांततेत पार पडली.
शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ; बैठकांवर भर
च्नवी मुंबई : अयोध्येतील जमीनमालकी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईत संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. त्याकरिता सर्वधर्मीयांच्या बैठका घेतल्या जात असून, पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
अयोध्या येथील जमिनीच्या निकालाच्या अनुषंगाने देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत समाजकंटकांकडून धार्मिक तेढ निर्माण केली जाई शकते. यामुळे उद्भवणारे संभाव्य वाद टाळण्यासाठी पोलिसांनाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
च्शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या जात आहेत. याशिवाय सायबर सेल पोलिसांमार्फत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. तर शहरातील महत्त्वाचे चौक व आवश्यक ठिकाणांवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.