अत्याधुनिक रूग्णवाहिका धूळ खात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:37 PM2019-12-19T23:37:00+5:302019-12-19T23:37:19+5:30

पालिकेचा ७० लाख खर्च वाया : पाच वर्षांमध्ये दोन्ही वाहनांचा वापर नाही; बसमध्ये रूपांतर करण्याचा विचार

The modern conservatory lies in the dust | अत्याधुनिक रूग्णवाहिका धूळ खात पडून

अत्याधुनिक रूग्णवाहिका धूळ खात पडून

Next

नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने २०१४ मध्ये दोन अत्याधुनिक फॅक व्हॅन विकत घेतल्या. ७० लाख रुपये खर्च करून विकत घेतलेल्या या रुग्णवाहिकांचे सप्टेंबर २०१४ मध्ये लोकार्पण करण्यात आले. मात्र पाच वर्षांमध्ये एकदाही या वाहनांचा उपयोग झाला नसून सर्व खर्च व्यर्थ गेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका धाडशी व महत्त्वाकांक्षी उपक्रम व प्रकल्प राबविण्यासाठी प्रसिद्ध आहे. स्वत:च्या मालकीचे धरण विकत घेण्यापासून ते अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र उभारण्यापर्यंत अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प येथे उभारण्यात आले आहेत. यामधील काही प्रकल्प फसले असून त्यावर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला. या फसलेल्या प्रयोगांमध्ये अत्याधुनिक फॅक व्हॅनचा (फ्लोटिंग अ‍ॅडव्हान्स कॅज्युलिटी कॉम्प्लेक्स) समावेश आहे. तब्बल ७० लाख रुपये खर्च करून दोन रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या. सप्टेंबर २०१४ मध्ये त्याचे प्रत्यक्षात लोकार्पणही करण्यात आले. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये सायन - पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूरसह पामबीच रोडवर वारंवार अपघात होत असतात. रेल्वे रूळ ओलांडताना अपघात होऊन तसेच रस्ते व रेल्वे अपघातांमध्ये प्रत्येक वर्षी जवळपास ५०० व्यक्तींना जीव गमवावा लागतो. तर दीड ते दोन हजार व्यक्ती गंभीर जखमी होतात. अपघात झाल्यानंतर जखमींवर तत्काळ उपचार करता यावेत यासाठी या अत्याधुनिक रुग्णवाहिका विकत घेण्यात आल्या होत्या. या रुग्णवाहिकेमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व इतर कुशल कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात येणार होते. रुग्णवाहिकेमध्ये छोटे शस्त्रक्रियागृहही तयार केले होते. परंतु प्रत्यक्षात एकदाही त्यांचा वापर करण्यात आलेला नाही.
अत्याधुनिक रुग्णवाहिकांचे लोकार्पण झाल्यानंतर काही दिवस त्या महापालिका मुख्यालयामध्ये उभ्या करण्यात आल्या होत्या. नागरिकांकडून टीका होऊ लागल्यानंतर त्या वाशी सेक्टर ६ मधील बस स्थानकाच्या आवारामध्ये उभ्या करण्यात आल्या. तेथून एनएमएमटीच्या तुर्भे डेपोमध्ये व कालांतराने पुन्हा महापालिका मुख्यालयाच्या आवारात उभ्या करण्यात आल्या. रुग्णवाहिकांचा वापर करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्याचा प्रयत्नही झाला. प्रत्येक वर्षी दोन्ही रुग्णवाहिका चालविण्यासाठी आणि त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ठेकेदारास ३ कोटी १९ लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये सादरही करण्यात आला होता. परंतु त्यास विरोध झाला. महापालिकेने स्वत: या रुग्णवाहिका चालविण्याची मागणी करण्यात आली. परंतु मनुष्यबळ कमी असल्यामुळे प्रत्यक्षात त्या पूर्ण करणे शक्य झाले नाही. २०१७ मध्ये रुग्णवाहिकेचे एनएमएमटी बसेसमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न झाला; परंतु तोही बारगळला. रुग्णवाहिकेचा विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा म्हणून उपयोग करण्याचा प्रयत्नही प्रत्यक्षात साकारू शकला नाही.
अत्याधुनिक ‘फॅक व्हॅन’ रुग्णवाहिका भंगारात
च्सप्टेंबर २०१४ मध्ये ७० लाख रुपये खर्च करून विकत घेतलेल्या अत्याधुनिक फॅक व्हॅन महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या. मात्र पाच वर्षांमध्ये एकदाही त्यांचा वापर झालेला नाही.
च्एका जागेवर उभ्या असल्यामुळे त्यांचा रंग उडाला आहे. टायरची झीज झाली आहे. अशीच स्थिती राहिली तर न वापरताच त्या भंगारात देण्याची वेळ येईल, असे मत व्यक्त केले जात आहे.
पुन्हा एनएमएमटीकडे सोपविणार
च्फॅक व्हॅनचा नक्की काय वापर केला जाणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. महापालिका मुख्यालयाच्या परिसरात उभी केलेली वाहने पंधरा दिवसांपूर्वी दुसरीकडे हलविण्यात आली आहेत.
च्आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता सद्य:स्थितीमध्ये ती वाहने आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार नसल्याचे सांगितले.
च्वाहन विभागाचे उपायुक्त नितीन काळे यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.
च्ही वाहने पुन्हा एनएमएमटीकडे सुपुर्द करून त्यांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती महापालिकेमधील सूत्रांनी दिली.
अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळवून देण्यासाठी दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या होत्या. पाच वर्षांमध्ये या दोन्ही रुग्णवाहिकांचा काहीही उपयोग झालेला नाही. महापालिकेचे पैसे व्यर्थ गेले आहेत. वापर न झाल्यामुळे वाहनांची झीज सुरू आहे. या वाहनांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.
- नामदेव भगत,
नगरसेवक, शिवसेना

Web Title: The modern conservatory lies in the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.