आपत्कालीन विभागाला आधुनिकतेचे वावडे

By admin | Published: June 23, 2017 06:14 AM2017-06-23T06:14:25+5:302017-06-23T06:14:25+5:30

एकेकाळी राज्यात सर्वात प्रभावी आपत्कालीन यंत्रणा असल्याचा मान मिळविणाऱ्या नवी मुंबईची यंत्रणा पहिल्याच पावसात नापास झाली आहे

Modern emergency arrangements for the emergency department | आपत्कालीन विभागाला आधुनिकतेचे वावडे

आपत्कालीन विभागाला आधुनिकतेचे वावडे

Next

नामदेव मोरे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : एकेकाळी राज्यात सर्वात प्रभावी आपत्कालीन यंत्रणा असल्याचा मान मिळविणाऱ्या नवी मुंबईची यंत्रणा पहिल्याच पावसात नापास झाली आहे. दोन वर्षांपासून आपत्कालीन पुस्तिका छापण्यात आलेली नाही. महावितरणपासून सर्व विभागांचे संपर्क क्रमांक, मदत करणाऱ्या संस्थांची माहिती व संपर्क क्रमांक शहरवासीयांपर्यंत पोहोचविण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. पालिकेचे संकेतस्थळही एक वर्षापासून अद्ययावत केलेले नसून सोशल मीडियाचाही प्रभावी वापर अद्याप करता आलेला नाही.
राज्यात २६ जुलै २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पूर्ण रायगड जिल्हा पाण्याखाली गेला होता. आपत्तीनंतर सर्वात अगोदर नवी मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर आले. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यापासून विद्युत व्यवस्था पूर्ववत करण्यामध्ये पालिका प्रशासनास यश आले होते. शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेनेही चांगले काम केले होते. नवी मुंबईमधील आपत्कालीन यंत्रणेची राज्य शासनानेही दखल घेतली होती. त्यानंतरही प्रत्येक वर्षी नवी मुंबईचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा सर्वात अगोदर तयार केला जात होता. एखादी आपत्ती घडल्यास प्रत्येक विभागनिहाय महावितरणचे कनिष्ठ ते अधीक्षक अभियंता यांचे मोबाइल नंबर, कार्यालयातील संपर्क क्रमांक, पोलीस आयुक्तांपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपर्यंत सर्वांचे संपर्क नंबर असणारी आपत्कालीन पुस्तिका सर्व नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांना वितरित केली जात होती. शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय, सामाजिक संस्थांचे संपर्क क्रमांक नागरिकांना सहज उपलब्ध केले जात होते. प्रत्येक नागरिकांपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक असल्याने कोणतीही घटना घडल्यास तत्काळ संबंधितांशी संपर्क साधता येत होता. पाणी साचणे. वृक्ष कोसळणे, आपघात व इतर सर्व आपत्तीमध्ये नागरिक थेट शासकीय यंत्रणेशी संपर्क साधत होते. यामुळे आपत्ती ओढविल्यास तत्काळ मदत उपलब्ध करून देता येत होती. नवी मुंबई महापालिकेने गतवर्षी आपत्कालीन आराखड्याच्या दोन्ही पुस्तिका प्रकाशित केल्या नाहीत. श्रीमंत महापालिकेने अधिकाऱ्यांची नावे, फोन नंबर, कार्यालयीन नावे, स्वयंसेवी संस्था, शहरातील धोकादायक वसाहती, दरडी कोसळण्याची ठिकाणे यांची माहिती उपलब्ध करून देणारी पुस्तिका न छापून पैसे वाचविल्याचे दाखविले. संकेतस्थळ व सोशल मीडियावरूनही संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले नाहीत. परिणामी, आपत्कालीन विभागाशी सर्वसामान्य नागरिकांचा संपर्कच तुटला. यावर्षीही अद्याप पुस्तिका छापण्याचे काम पूर्ण झालेले नाही. पुस्तिका छापली नसली तरी सोशल मीडियामधून सर्व संपर्क क्रमांकाची पीडीएफ फाइल प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे शक्य होते; परंतु प्रशासनाला त्याचीही आवश्यकता वाटलेली नाही. यामुळे पावसामुळे कोसळलेले वृक्ष, साचलेले पाणी व इतर घटनांविषयी आपत्कालीन विभागाला माहिती देणे नागरिकांना शक्य होत नाही.


सोशल मीडियाचा
वापर करावा
आपत्कालीन विभागाने शहरातील महावितरण, पोलीस, महापालिका, सिडको, एपीएमसी, एमआयडीसी व इतर शासकीय कार्यालयांचे संपर्क क्रमांक, जबाबदार अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर असलेली अद्ययावत पुस्तिका वॉट्स अ‍ॅप, फेसबुक व पालिकेच्या संकेतस्थळाद्वारे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे; परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सोशल मीडियाचा अद्याप वापर करण्यास सुरुवात झालेली नाही.

पुस्तिका
छापण्यास विलंब
आपत्कालीन विभागाने मे अखेरपर्यंत आपत्कालीन आराखडा तयार करणे आवश्यक आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी आपत्कालीन आराखडा भाग १ व २च्या पुस्तिका नागरिकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत; परंतु निविदा प्रक्रियेस झालेल्या विलंबामुळे पुस्तिका वेळेवर छापण्यात आलेली नाही. यामुळे आपत्ती उद्भवल्यास नागरिकांशी संपर्क साधता येत नाही.

पुढील माहिती पोहोचविण्यात अपयश
आपत्ती काळात मदत करणाऱ्या सामाजिक संघटना
महावितरण, पालिका, पोलिसांसह शासकीय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक
शहरातील दरडी कोसळण्याची ठिकाणे व त्यांचा तपशील
पाणी साचण्याची शक्यता असणारी ठिकाणे
धोक्याची सूचना देणारे फलक लावलेले नाहीत

पनवेलमध्येही बरसला
पनवेलसह तालुक्यातील ग्रामीण भागात गुरुवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. पनवेलमधून जाणाऱ्या सायन-पनवेल महामार्गावर पहिल्या पावसातच पाणी साचल्याचे पाहावयास मिळाले. ग्रामीण भागात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दिलासा दिला. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. कळंबोली, सीबीडी, बेलापूर या ठिकाणच्या सर्कलवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले.

लोकल विस्कळीत
प्रवाशांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलसेवेलाही पावसामुळे दणका बसला. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. पनवेल ते सीएसटी, तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल काही मिनिटे उशिराने धावत होती. रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने फलाटांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. रेल्वे वाहतूक खोळंबल्याने अनेकांनी पर्यायी मार्गाचा वापर केला. फलाटांवरही पाणी साचल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. सानपाडा रेल्वेस्थानकाला गळतीची धार लागली असून, प्रवाशांना लोकलची वाट पाहत उभे राहणेही अशक्य झाले आहे.

Web Title: Modern emergency arrangements for the emergency department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.