सागरी व्यवसायासाठी आधुनिक सुविधा हव्यात - श्रीपाद नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 09:36 AM2021-12-04T09:36:53+5:302021-12-04T09:37:22+5:30
जागतिक सागरी आणि एक्झिम समुदायाला जागतिक दर्जाच्या सेवा देऊ शकतील अशा अनेक पायाभूत आवश्यक सोयी सुविधा जेएनपीटी बंदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
उरण : जागतिक सागरी आणि एक्झिम समुदायाला जागतिक दर्जाच्या सेवा देऊ शकतील अशा अनेक पायाभूत आवश्यक सोयी सुविधा जेएनपीटी बंदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच जागतिक सागरी व्यापार व्यवसाय वृद्धीसाठी बंदरात अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला असून, त्या महत्त्वाच्या असल्याचे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. नाईक यांनी जेएनपीटी येथील टर्मिनल्सला शुक्रवारी भेट दिली आणि कामाचा आढावा घेतला. यावेळी टर्मिनलसंबंधी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
जेएनपीटी येथील टर्मिनल्सच्या त्यांच्या भेटी दरम्यान, मंत्री यांनी बंदर भागधारकांशी संवाद साधला आणि पोर्टची कार्यक्षमता आणि क्षमता आणखी वाढविण्यासाठी टर्मिनल ऑपरेशन्स ऑप्टिमाइझ करण्यासाठी हाती घेतलेल्या अनेक तंत्रज्ञान-सक्षम ‘स्मार्ट पोर्ट इनिशिएटिव्ह’चा शोध घेतला. याव्यतिरिक्त मंत्र्यांनी कार्यक्षम आणि कुशल क्रेन ऑपरेटर्सना प्रशिक्षण देण्यासाठी केला जातो व बंदर ऑपरेशन्सचा अविभाज्य आणि मुख्य भाग असलेल्या आरएमक्युसी क्रेन सिम्युलेटरचा अनुभव घेतला.
बंदराच्या पाहणीनंतर जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकी दरम्यान जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना बंदराच्या भविष्यातील विस्तार योजनांची माहिती दिली. तसेच जेएनपीटीने नुकत्याच सुरू केलेल्या ‘ड्वार्फ कंटेनर ट्रेन’ सेवा, कोस्टल बर्थ यासह व्यवसायात सुलभता वाढविण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांचीही माहिती दिली. ग्रीन पोर्ट इनिशिएटिव्ह, मल्टी-प्रॉडक्ट सेझ, सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा, ड्राय पोर्ट्स, डिजिटायझेशन इनिशिएटिव्ह, वाढवण बंदर आणि इतर जेएनपीटी बंदर अंतर्गत असलेल्या मल्टिमॉडल पायाभूत सुविधा व प्रकल्पांची प्रगती सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी राज्यमंत्री नाईक यांचे जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी स्वागत केले.