पनवेल: एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलीस त्यातील आरोपी व गुन्ह्यासाठी वापरलेल्या विविध वस्तू जप्त करतात़. तो खटल्याच्या वेळी सादर करण्यासाठी मुद्देमाल कक्षात जपून ठेवला जातो़. मात्र, अनेकदा या मुद्देमालाचे व्यवस्थित जतन न झाल्याने प्रत्यक्ष काही वर्षांनी खटला सुरु झाल्यावर तो वेळेवर न सापडणे, तो खराब होणे, असे अनेक वेळा होते़ त्याचा खटल्यावरही परिणाम होत असतो़. यापुढे आता तसे होणार होणार नाही़.पनवेल येथील पोलीस उपायुक्त कार्यालयात अत्याधुनिक मध्यवर्ती मुद्देमाल केंद्र (ऍव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर )तयार करण्यात आले आहे.
या केंद्राचे दि.10 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हा केंद्राचे उदघाटन करण्यात येणार आहे. या ठिकाणी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोन च्या सर्व पोलीस ठाण्यातील मुद्देमाल जतन करण्यात येणार आहे़. पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्ष म्हणजे एकप्रकारची अडगळीची खोली असे आतापर्यंत तिचे स्वरुप राहत आले आहे़. अनेकदा एखाद्या खटल्यातील कागदपत्रे, जप्त केलेल्या वस्तू या पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात ठेवल्या जातात़. खटल्याचा निकाल लागल्यानंतर त्या न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करायच्या असतात़. अनेकदा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या झाल्यावर जेव्हा खटल्याची सुनावणी सुरु होते, त्यावेळी संबंधित खटल्यातील मुद्देमाल शोधण्यासाठी पोलिसांना रजिस्टर धुंडाळावी लागतात़ अनेकदा वेळेवर कागदपत्रे न सापडणे, सापडली तर ती खराब होणे असे प्रकार घडतात़ सध्या शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये किती मुद्देमाल आहे. याची कोणतीही एकत्रित माहिती कोठेही उपलब्ध नाही़. या मध्यवर्ती कक्षामध्ये सर्व मुद्देमाल पोलीस ठाणेनिहाय रॅक्स व बॉक्समध्ये जतन करण्यात येणार आहे़. या प्रत्येक मुद्देमालाला क्युआर कोडाचा अवलंब केला जाणार आहे़. त्यामुळे पोलिसांना जेव्हा लागेल, त्यावेळी एका क्लिकवर संबंधित केसचा मुद्देमाल कोठे व कोणत्या रॅक्समध्ये आहे हे समजणार आहे़. न्यायालयात सादर करताना व तो परत केंद्रात जमा करताना स्वतंत्र चलन असणार आहे़ त्यामुळे सर्व मुद्देमालावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे़.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत प्रथमच अशाप्रकारे आधुनिक मुद्देमाल केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.या मुद्देमाल केंद्राकरिता मोबाईल अॅप, सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे़. या केंद्रात सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून येथे 24 तास सशस्त्र गार्डचा बंदोबस्त असणार आहे़. आधुनिक पद्धतीमुळे क्यू आर कोडद्वारे मुद्देमालाचा शोध घेता येणार आहे.याकरिताच या आधुनिक मुद्देमाल कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.जुन्या खटल्यातील मुद्देमाल एका क्लिकवर दिसणार आहे.मुद्देमालाचे जतन एकाच पद्धतीने आणि सुसुत्रीकरण होणार आहे.या केंद्रावर सीसीटीवीचा व्हॉच असणार आहे.- विवेक पानसरे (उपायुक्त ,परिमंडळ दोन नवी मुंबई पोलीस आयुक्तालय)