मोदी सरकारने दिली विकासाला चालना
By admin | Published: July 4, 2017 07:25 AM2017-07-04T07:25:06+5:302017-07-04T07:25:06+5:30
मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारतसारख्या अभिनव योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने देशाच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारतसारख्या अभिनव योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाने (एमईडीसी)आयोजित केलेल्या १३व्या डॉ. डी.आर. गाडगीळ स्मृती व्याख्यानाच्या निमित्ताने भारताच्या नवीन आर्थिक परिस्थितीमधील बदल या विषयावर अलीकडेच प्रभू यांनी व्याख्यान दिले. यावेळी प्रभू म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत जीडीपी वाढत होता; परंतु उत्पादन क्षेत्राचे त्यातील योगदान फारसे नव्हते. जीडीपीतील उत्पादन क्षेत्राचे योगदान वाढविणे आवश्यक होते.
प्रभू यांनी आपल्या भाषणात दिवंगत डॉ. डी. आर. गाडगीळ यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची स्थापना करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सहकारी संस्था आणि कॉपोर्रेट यांच्या भागीदारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा होईल आणि त्याचा खूप मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांनाही पुरवठा साखळीचा फायदा मिळाला पाहिजे. आज, शेतकऱ्यांचे त्यांनीच घेतलेल्या उत्पादनावर कोणतेही नियंत्रण नाही. यात बदल झाला तरच शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील, असे प्रभू म्हणाले.
पाण्यावरील विशेष पुस्तिकेचे प्रकाशन
एमईडीसीचे अध्यक्ष दीपक नाईक यांनी संस्थेच्या साठ वर्षांच्या इतिहासाला उजाळा दिला. आपल्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त एमईडीसीने पाण्यावरील एका विशेष पुस्तिकेचे प्रकाशन केले. याप्रसंगी जलस्रोत विभागाचे उपसचिव डॉ. संजय बेलसरे,
जैन इरिगेशनच्या दिलीप कुलकर्णी यांचीही भाषणे झाली.