लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुक्रवारी प्रारंभ होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी कोकण विभागीय समितीची बुधवारी बैठक झाली. यात कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांचा गोंधळ होऊ नये, यासाठी त्यांच्या जिल्हानिहाय ओळखपत्र तसेच कलर कोड देण्याबाबत सूचना कोकण विभागीय आयुक्तांनी दिल्या.
कोकण भवन सभागृहात झालेल्या या बैठकीत महिला सशक्तीकरण अभियान सोहळ्याच्या नियोजनासाठी कोकण विभागातील २६ प्रमुख अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले.
यावेळी नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर, आयु्क्त रुबल अग्रवाल, परिवहन आयुक्त विवेक भिमणवार, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, कल्याण आयुक्त इंदुराणी जाखड, पनवेल आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.
महिलांच्या मदतीसाठी खास समन्वयक
कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांचा गोंधळ होऊ नये, यासाठी वाहनतळापासून ते मंडपापर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी समन्वयकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवक व समन्वयक यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. उमेद, अंगणवाडी सेविका, बचतगट यांनी येताना वृद्ध, लहान मुले, आजारी व्यक्ती, गर्भवती महिलांना सोबत आणू नये, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. कार्यक्रमस्थळी मंडपात येताना पर्स, मोबाइल आणि ओळखपत्र यांशिवाय कोणत्याही इतर गोष्टी जवळ बाळगता येणार नाहीत, अशा सूचनाही सर्व यंत्रणांना दिल्या.
विविध ठिकाणांहून सुमारे एक लाखाहून अधिक महिला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या राहत्या ठिकाणापासून कार्यक्रम स्थळापर्यंतच्या सेवासुविधा, तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वाहनांसाठी पार्किंग, प्रवेशद्वार, विविध ठिकाणांहून नवी मुंबईला जोडणारे रस्ते, आदी स्वरूपाच्या सेवासुविधांचा या बैठकीत आढावा घेतला.