पनवेल महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:40 PM2019-11-17T23:40:50+5:302019-11-17T23:40:56+5:30
सात जणांना चावा; महिनाभरातील दुसरी घटना, शहरवासीयांत भीतीचे वातावरण
कळंबोली : भटक्या कुत्र्याने पनवेल शहरातील सुमारे ४० जणांना चावा घेतल्याची घटना ताजी असतानाच रविवारी याच शहरातील मालधक्का परिसरात एका भटक्या कुत्र्याने आणखी सात जणांचा चावा घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मोकाट कुत्र्यांच्या या दहशतीमुळे पनवेल शहरातील रहिवाशांत कमालीची घबराट पसरली आहे.
पनवेल महापालिका हद्दीत मोकाट कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. कुत्र्यांच्या वाढीवर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण न राहिल्याने दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर बनताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत पनवेलमधील लाइन आळीत एका भटक्या कुत्र्याने तब्बल ४० जाणांना चावा घेतला होता. त्यातील १८ जणांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असतानाच रविवारी पनवेल्या मालधक्का परिसरात एका भटक्या कुत्र्याने पुन्हा सात जणांचा चावा घेतला. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या विरोधात पनवेलकरांत कमालीचा असंतोष पसरला आहे.
शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा नाही. अगोदर सिडकोच्या माध्यमातून पोदी येथे निर्बीजीकरण केंद्र चालविले जात होते. त्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. या एजन्सीच्या माध्यमातून शहरातील तब्बल दहा हजार मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोने ही सेवा हस्तांतरित केली आहे. तेव्हापासून श्वान निर्बीजीकरण यंत्रणा बंद पडल्याचे बोलले जात आहे. महापालिकेच्या या उदासीनतेचा ताप शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. कुत्र्यांची संख्या वाढल्याने महापालिका प्रशासन आणि त्याअनुषंगाने शहरवासीयांची डोकेदुखी वाढली आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रेबीजच्या इंजेक्शनसाठी संबंधितांना उपजिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागते.
मागील घटनेच्या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन श्वानदंश झालेल्या रुग्णांची चौकशी केली होती. त्यानंतर श्वान नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही कोणत्याच हालचाली झाल्या नसल्याचे रविवारच्या घटनेवरून दिसून आले आहे. दरम्यान, रविवारी भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्यात सायली मोहिते, अशोक गुप्ता, शुभम सोनवणे यांच्यासह आणखी चार जणांना श्वानदंश झाला आहे. श्वानदंश झालेल्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी मुंबईतही श्वानांचा उपद्रव
मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे पनवेलमधील रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या कुत्र्यांना आवर घालणारी कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे नाही. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालल्याचे लागोपाठ घडलेल्या दोन घटनांवरून स्पष्ट झाले आहे. पनवेलसह नवी मुंबईतही भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न गंभीर बनला आहे. एरव्ही गळा काढून ओरडणाऱ्या श्वानप्रेमी संघटनांनी आता तरी यासंदर्भात लवचिक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी लवकरच एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, मालधक्का परिसरात सात जणांना चावा घेणाºया त्या भटक्या कुत्र्याला जेरबंद करण्यात आले आहे.
- शैलेश गायकवाड,
आरोग्य निरीक्षक, पनवेल महापालिका