मोक्कामधील आरोपीची भरदिवसा साथीदाराकडूनच हत्या; नेरुळ येथील घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: February 13, 2024 09:46 PM2024-02-13T21:46:26+5:302024-02-13T21:47:39+5:30
इमारतीखाली दबा धरून बसलेल्या टोळीने केला हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मोक्काच्या आरोपीची हत्या केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. यामध्ये मृताची पत्नी देखील जखमी झाली आहे. हल्ला करणारा हा मृत गुन्हेगाराचा सहकारी असून त्याच्यावरही मोक्का लागलेला आहे.
चिराग लोके (30) असे मृताचे नाव असून तो नेरूळ सेक्टर 20 येथे राहणारा आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास लोके हा घराबाहेर येत असताना त्याचा सहकारी अरविंद सोडा (42) साथीदारांसह इमारतीखाली दबा धरून होता. यावेळी त्याने आपसातील वादातून चिराग याच्यावर रोडने व इतर हत्यारांनी जीवघेणा हल्ला केला. यादरम्यान चिराग याची पत्नी प्रियांका हिने पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावरही त्याने हल्ला करून पळ काढला आहे. यावेळी मारेकरू सोडा याच्यासोबत इतरही काहीजण होते.
या घटनेनंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल केले असता चिराग लोकेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. चिराग व अरविंद यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून दोघांवर एका गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान त्यांच्यातल्या वादाचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र पुणे, ठाणे व मुंबई नंतर नवी मुंबईत गुन्हेगारांमध्येच झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.