लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी महिला पोलिसांचे कपडे फाडून विनयभंग केल्याचा गुन्हा हिललाईन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलक महिलांवर लाठीहल्ला करताना पोलिसांनी गावातील महिलांचाही विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्याची तयारी ग्रामस्थांनी केली आहे. तसे झाल्यास पोलीस आणि आंदोलकांंत परस्परविरोधी तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे. महिला पोलिसांच्या विनयभंगाचा आरोप शेतकऱ्यांनी फेटाळून लावला असून या आरोपाबाबत पोलिसांनी पुरावे देण्याची मागणी जमीन बचाव आंदोलनाच्या नेत्यांनी केली आहे. असे पुरावे दिले नाहीत, तर तर आंदोलन दडपण्यासाठी पोलीस खोटे गुन्हे दाखल करत करून दडपण आणत दहशत पसरवत असल्याचे सिद्ध होईल, असा आरोप आंदोलकांनी केला आहे. आंदोलकांनी जाळपोळ केली, दगडफेक केली आणि बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग करुन त्यांच्या अंगावरील कपडे फाडल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल तीन गुन्ह्यांतील एकामध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्याचे कपडे फाडून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची वैयक्तिक तक्रार महिला पोलिस कर्मचाऱ्याने केलेली नसली, तरी त्यात पोलीस अधिकारी फिर्यादी आहे. या फिर्यादीत जमीन बचाव आंदोलन समितीचे जवळपास २५ पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि ५०० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जमीन बचाव आंदोलनाचे अध्यक्ष मथुर म्हात्रे यांनी विनयभंगाचा आरोप फेटाळून लावला. आंदोलन करणाऱ्या महिलांवर लाठीहल्ला करतेवेळी पोलिसांनीही या महिलांचा विनयभंग केल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला आणि या प्रकरणी पोलिसांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी आमच्याविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. त्यात आम्हाला सराईत गुन्हेगार ठरवून तुरूंगात डांबण्याचा कट रचला आहे. उलट पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने बळाचा वापर केला. पोलिसांनी आधी महिला मोर्चेकऱ्यांवर लाठीमार केला. त्यामुळे मोर्चातील पुरुष मंडळी भडकली. त्यांच्याकडून त्याला प्रतिकार करण्यात आला. मात्र हा घटनाक्रम लक्षात घेतलेला नाही. पोलिसांनी आमच्यावर महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला असेल, तर पोलिसांनीही मोर्चात सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्याचा विनयभंग करुन त्यांना मारहाण केली आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि पुरुष पोलिसांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी संतप्त प्रतिक्रिया म्हात्रे यांनी दिली. जखमी शेतकऱ्यांवर पाळत?आंदोलनाच्या रात्रीपासूनच पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन करत आरोपींसाठी शोध मोहीम सुरु केली. नेवाळी नाक्यावरील पोलीस बंदोबस्त अद्याप हटविण्यात आलेला नाही. त्याठिकाणी राज्य राखीव दलाचे पोलीस व शहर पोलिसांचा ताफा तैनात आहे. ज्या रुग्णालयात जखमी शेतकरी उपचार घेत आहेत, त्या रुग्णालयाबाहेरही पोलिसांची एक व्हॅन बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. पोलिसांच्या पेलेट गनने जखमी झालेल्या शेतकऱ्यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. उपचार घेऊन ते बाहेर पडताच त्यांना अटक केली जाईल, अशी चर्चा गावकऱ्यांत आहे.हिललाईन पोलिसांनी ६७ जणांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात जमीन बचाव समितीचे अध्यक्ष मुथर म्हात्रे यांच्यासह नेवाळी ग्रामपंचायतीचे सरपंच चैनू जाधव यांचा समावेश आहे. बाळा जाधव, बाळाराम म्हात्रे, विलास पाटील, योगेश म्हात्रे, रवी म्हात्रे, नाना डोंगरे, मयूर जाधव, जनार्दन डोंगरे, नीलेश म्हात्रे, संतोष म्हात्रे, यशवंत गायकवाड, प्रकाश गायकवाड, नीलेश जाधव, संजय पाटील, राजेश म्हात्रे, विजय पाटील, बाळा भोईर, यशवंत जाधव, मयूर म्हात्रे, राजेश वारे, सुखदेव जाधव, साईनाथ पाटील, कुणाल जाधव, अशोक जाधव, वंडारेश्वर भोईर, अर्जून जाधव, जितेंद्र पावशे, भारत कलिंगडवाला, नरेश वायले, सुनील वायले, अशोक जाधव, उमेश फुलोरे, वसंत जाधव, बारक्या मढवी, श्याम पाटील, नरेश सोरखादे, समीर म्हात्रे, काल्या म्हात्रे, संतोष चिकणकर, पप्पू ठाकरे, साईनाथ चिकणकर, सूरज मोरे, ऋषिकेश म्हात्रे, जगदीश म्हात्रे, अनिल सोरखादे, विलास पाटील, संजय पाटील, अमित चिकणकर, अजय पाटील, धनेश म्हात्रे, भास्कर चिकणकर, रुपेश म्हात्रे, बिंधास म्हात्रे, अनंत म्हात्रे, मनोज म्हात्रे, मुकेश कोळेकर, संदीप म्हात्रे, भोपेश म्हात्रे, मिलन चिकणकर, सोमनाथ चिकणकर, अनिल म्हात्रे, किरण सोरखादे, जयेंद्र म्हात्रे यांच्या नावांसह ४०० ते ५०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांवरही विनयभंगाचे गुन्हे?
By admin | Published: June 25, 2017 4:06 AM