विनयभंग करणाऱ्या रेल्वेगार्डला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 03:23 IST2018-03-31T03:23:06+5:302018-03-31T03:23:06+5:30
महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्या प्रकरणी रेल्वेच्या गार्डला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे

विनयभंग करणाऱ्या रेल्वेगार्डला अटक
नवी मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्या प्रकरणी रेल्वेच्या गार्डला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी घणसोली रेल्वेस्थानकात त्याने फलाटावरून चाललेल्या विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य केले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पळाला असता, वाशीतील मित्राच्या घरातून अटक करण्यात आली.
ए. के. सिन्हा (४१) असे अटक करण्यात आलेल्या रेल्वेगार्डचे नाव आहे. त्याने आॅनड्युटी असताना मोटरमनच्या केबिनमधून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता. पीडित विद्यार्थिनी घणसोलीची राहणारी असून, पनवेल येथे महाविद्यालयात शिक्षण घेते. मंगळवारी दुपारी ठाणे लोकलने ती घरी येत होती. यादरम्यान संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घणसोली स्थानकात ती रेल्वेतून उतरून फलाटावर चालत होती. या वेळी त्याच लोकलच्या पाठच्या बाजूच्या मोटरमन केबिनमध्ये बसलेल्या गार्डने गुप्तांग दाखवून विनयभंग केल्याची पीडित विद्यार्थिनीची तक्रार होती. तिने घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली होती.
यापूर्वी रेल्वेमध्ये महिला प्रवाशांना लुटारू तसेच गर्दुल्यांपासून असुरक्षितता वाटत होती. अशातच आॅनड्युटी रेल्वे कर्मचारीच मुलींची छेड काढू लागल्याच्या या घटनेचा संताप व्यक्त होत आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान ए. के. सिन्हा (४१) असे गार्डचे नाव असल्याचे समोर आले; परंतु पोलीस आपला शोध घेत असल्याची चाहूल लागताच त्याने घरातून पळ काढला होता. अखेर वाशीतील एका मित्राच्या घरी तो लपलेला असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांना मिळाली होती. यानुसार त्या ठिकाणी छापा टाकून सिन्हा याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.