आई मलाही जायचंय शाळेत! चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा हट्ट; काही पालकांची ना, तर काहींना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 01:38 AM2021-02-14T01:38:53+5:302021-02-14T01:39:22+5:30
school : पनवेल तालुक्यातील पाचवी ते आठवीपर्यंच्या शाळा २८ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. आता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत.
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता पहिली ती चौथीपर्यंतच्या मुलांना शाळा सुरू व्हाव्यात असे वाटत आहे. घरी ताई, दादा शाळेत जात आहेत. मलाही शाळेत जायचंय, असा हट्ट चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. पहिली ते चौथीपर्यंतची मुले घरी राहून कंटाळली आहेत; परंतु कोरोनाच्या भीतीने मुलांना शाळेत पाठविण्यास काही पालकांची ना आहे, तर काहींना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
पनवेल तालुक्यातील पाचवी ते आठवीपर्यंच्या शाळा २८ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. आता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत. घरी राहून ऑनलाइन शिकवणीला मुले कंटाळली आहेत. शाळेतील शिक्षणासोबतच मित्रांसोबत खेळणे, बागडणे, मधल्या सुटीतील डबा पार्टी करणे, खोड्या करणे आदी गोष्टींपासून दूर राहिल्याने शाळा कधी सुरू होतील असा प्रश्न लहान मुलांकडून विचारला जात आहे. मुलांचे मन चंचल असते. त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असते. खुल्या वातावरणात त्याचा सदुपयोग केला तर लहान मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते; परंतु घरी राहिल्याने लहान मुलांचा कोंडमारा होत असून, लवकर शाळा सुरू कराव्यात, असे काही पालकांकडून सांगण्यात येत आहे.
मुलांना हवी आहे शाळा
सगळ्यांच्या शाळा सुरू आहेत. आम्हालाच सुटी देण्यात आली आहे. शाळेत सर, मॅडम येतात. ऑनलाइन क्लासचा कंटाळा आला आहे. मलाही शाळेत जायचं आहे; पण शाळा सुरू नाहीत. खूप झाली सुटी आता, शाळा सुरू व्हायला पाहिजेत.
-साईराज शितोळे इयत्ता १ ली
मी घरी राहून कंटाळले आहे. मला शाळेत जायचे आहे. बाबा व आई शाळेत जाऊ देत नाहीत. शाळा सुरू झाली नाही असे सांगतात. खूप कंटाळा आला आहे. शाळा कधी सुरू होईल माहीत नाही.
-शीतल पवार इयत्ता २ री
शाळा बंद होऊन ११ महिने झाले आहेत. पास झालो आहे की नाही, हेही माहीत नाही. ऑनलाइन क्लासचा कंटाळा आला आहे. घरी दीदी शाळेत जाते. मला मात्र घरी राहावे लागत आहे. मलाही शाळेत जायचं आहे; पण शाळा सुरू नाही ना, काय करणार. घरीच बसावं लागतयं. कधी शाळा सुरू होईल असे वाटते आहे.
-प्रेम धनराज पवार इयत्ता ४ थी
पालकांना चिंता....
मुले घरी बसून कंटाळली आहेत. पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू झाल्या आहेत. घरी लहान मुले शाळेत जाण्यासाठी हट्ट धरतात. कोरोनाच्या उपाययोजना करून आता लहान मुलांच्या शाळा सुरू करायला हरकत नाही; पण शाळेकडून योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे.
- मंगेश आढाव, पालक
पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू झाल्या आहेत. हे बरोबर आहे. कोरोना आणखी कमी झालेला नाही. पनवेल परिसरात कोरोना रुग्ण सापडत आहेत. लहान मुलांना कोरोनाचा धोका लवकर संभवतो. मुलांना कमी-जास्त झाले तर त्यास जबाबदार कोण? त्यामुळे शाळा सुरू करू नये.
-अमोल शितोळे पालक
यंदा लहान मुलांच्या शाळेचे शैक्षणिक वर्ष कोरोना काळामुळे संपत आले आहे. दोनच महिन्यांसाठी कशाला शाळा सुरू करायला पाहिजे. जूनपासून शाळा सुरू व्हायला पाहिजेत. अद्याप तरी कोरोना संपत आलेला नाही. त्यामुळे शाळा सुरू होऊ नयेत.
- राजेश ठाकर
पालक
कोरोनाची ताळेबंदी उठल्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. आता पनवेल परिसरातील लोकलही सुरू आहेत. त्याचबरोबर परिसरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळा सुरू करू नयेत. जूनपासूनच शाळा सुरू करण्यात याव्यात.
चंद्रकांत राऊत पालक