‘ममी-पप्पा, आय हेट यू...’ पोलिसांची उडाली झोप; अभ्यासाच्या तगाद्यामुळे मुलीने सोडले घर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 11:35 AM2024-08-15T11:35:58+5:302024-08-15T11:37:36+5:30
पहाटेच्या सुमारास एक फोन खणखणला आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: ‘ममी-पप्पा, आय हेट यू...’अशी चिठ्ठी लिहून सातवीतली मुलगी घर सोडून गेल्याचा प्रकार मंगळवारी रात्री नेरूळमध्ये घडला. यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेताच पोलिसांनीही तपासाची सूत्रे फिरवली. मुलगी मिळून न आल्याने ती कुठे गेली असेल, तिच्यासोबत काय घडले असेल, अशा अनेक प्रश्नांनी पोलिसांची झोपच उडाली. परंतु, पहाटेच्या सुमारास एक फोन खणखणला आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.
नेरूळ परिसरात राहणारी व एका नामांकित शाळेत सातवीत शिकणारी मुलगी घर सोडून गेली होती. बुधवारी तिचा गणिताचा पेपर होता. त्यातून आई-वडील सतत अभ्यासाचा तगादा लावत होते. यामुळे कंटाळलेल्या या मुलीने ‘मम्मी- पप्पा, आय हेट यू...’ अशी चिठ्ठी ठेवून घर सोडले होते.हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर आई-वडिलांनी नेरूळ पोलिस ठाणे गाठले. यावेळी मुलगी मिसिंग असल्याचा प्रकार गांभीर्याने घेऊन वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी तातडीने तपास पथके केली.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून ती रेल्वेने गेल्याचे दिसून आले. परंतु, पुढे कुठे गेली हे स्पष्ट होत नव्हते. तरीही सर्व पथकांनी नवी मुंबईसह मुंबईतल्या रेल्वे स्थानकांमध्ये, पोलिस ठाण्यांमध्ये तिच्याबद्दल चौकशी सुरू केली. बुधवारी सकाळी पोलिसांना एक फोन आला आणि त्यांनी उलवेकडे धाव घेतली. उलवे सेक्टर १९ मधील द्वारकानाथ सोसायटीच्या दोन सुरक्षारक्षकांनी तिला सुरक्षित पोलिसांच्या ताब्यात दिले.
असा झाला उलगडा
घर सोडताना सोबत आणलेल्या हजार रुपयातून तिने कोल्डड्रिंक व चॉकलेट घेतले होते. तेच खाऊन तिने उघड्यावर रात्र काढली. रात्री ती सोसायटीत येत असताना तिच्याकडे बॅग, पाण्याची बॉटल असल्याने ती इथलीच राहणारी असावी, असे समजून सुरक्षारक्षकांनी तिच्याकडे चौकशी नव्हती केली. सकाळी ती भिंतीलगत झोपलेली आढळून आल्याने त्यांनी लगेच पोलिसांना कळवले, अन् साऱ्या प्रकाराचा उलगडा होऊन सर्वांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.