सोमवारी बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:49 AM2017-08-30T01:49:39+5:302017-08-30T01:49:50+5:30
पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील सोमवारी बेपत्ता झालेल्या दोन मुलांपैकी एकाचा मृतदेह गाढी नदीमध्ये सापडला आहे. तर दुसºया मुलाचा शोध सुरू आहे. मात्र, या शोधमोहिमेच्या वेळी पनवेलमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा ढिम्म कारभार समोर आला आहे.
पनवेल : पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील सोमवारी बेपत्ता झालेल्या दोन मुलांपैकी एकाचा मृतदेह गाढी नदीमध्ये सापडला आहे. तर दुसºया मुलाचा शोध सुरू आहे. मात्र, या शोधमोहिमेच्या वेळी पनवेलमधील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा ढिम्म कारभार समोर आला आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून रायगड जिल्ह्यासह पनवेलमध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे. याशिवाय प्रशासनाकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, येथील आपत्ती व्यवस्थापनाला परिस्थितीचे फारसे गांभीर्य दिसत नाही. दरड कोसळणे किंवा इतर आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत तयारी केली जाते. सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासोबतच आपत्ती उद्भवल्यास त्याचा मुकाबला कसा करावा, याची तयारी करून घेतली जाते; परंतु याबाबत फक्त कागदोपत्री देखावा करण्यात येतो. त्यामुळेच एखादी मोठी आपत्ती निर्माण झाल्यानंतर या विभागाच्या मर्यादा स्पष्ट होतात.
अतिवृष्टी झाली, पूर आला, वीज पडली, भूकंप झाला, त्यातून नुकसान झाले. अशा वेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असावी लागते. मात्र, पनवेलमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज नसल्याचे दिसत आहे. सुकापूर येथे राहणारे प्रथमेश नानाभाऊ पाटील (६) व मयांक अडसूळ (३.५ वर्षे) हे दोघे रविवारी खेळायला बाहेर गेले होते; पण बराच वेळ झाला तरी ते दोघे घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. ही दोन्ही मुले गणेशघाटावर खेळत असल्याचे रहिवाशांनी पाहिले होते. त्यामुळे सिडकोच्या अग्निशमन दलाची तीन पथके तसेच पनवेल महापालिका अग्निशमन दलाच्या दोन पथकांनी शोधकार्य सुरू केले.