रिक्षानाक्यावर चालकांची मक्तेदारी

By admin | Published: July 3, 2017 06:44 AM2017-07-03T06:44:58+5:302017-07-03T06:44:58+5:30

पनवेल परिसरात अनेक रिक्षाचालक-मालक संघटना कार्यरत आहेत. या संघटनांकडून एका नाक्यावरील चालकांना दुसऱ्या ठिकाणी

The monopoly of the drivers on the rickshaw | रिक्षानाक्यावर चालकांची मक्तेदारी

रिक्षानाक्यावर चालकांची मक्तेदारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : पनवेल परिसरात अनेक रिक्षाचालक-मालक संघटना कार्यरत आहेत. या संघटनांकडून एका नाक्यावरील चालकांना दुसऱ्या ठिकाणी व्यवसाय करू दिला जात नाही. संबंधित रिक्षाचालकांच्या संघटनांची अरेरावी व मक्तेदारी दिवसेंदिवस वाढतच आहे. अन्यत्र ठिकाणाहून एखादा रिक्षाचालक आल्यास त्याला प्रवासी भाडे भरण्यास नकार दिला जातो, शिवाय शिवीगाळ करून मारहाण करण्याचे प्रकारही घडले आहेत.
दररोज वादविवाद सुरू असल्याने त्यांचा त्रास प्रवाशांनाही होत आहे. याबाबत संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर त्याचबरोबर इतर ठिकाणी अंतर्गत प्रवाशांकरिता प्रवासी तीनआसनी रिक्षांना प्राधान्य देतात. एनएमएमटीचे जाळे पसरविण्याचे काम सुरू असले तरी मागणीप्रमाणे बसच्या फेऱ्या अपुऱ्या आहेत. त्याचबरोबर अनेक मार्गावर अद्याप बससेवा सुरू झाली नसल्याने रिक्षा हा एकमेव पर्याय आहे. पनवेल परिसरात आजही मीटरप्रमाणे रिक्षा चालत नाहीत. याकरिता अनेक प्रयत्न झाले; परंतु रिक्षाचालकांनी मीटर डाउन केलेच नाही. याशिवाय नियमानुसार कोणताही रिक्षाचालक कुठेही व्यवसाय करू शकतो; परंतु पनवेलसह सिडको वसाहतीतील रिक्षाचालक तसा व्यवसाय करीत नाहीत. एका वसाहतीतील रिक्षावाला दुसरीकडे भाडे घेऊन गेला तर त्याला त्या ठिकाणी रिक्षा उभी करून प्रवासी घेऊ दिले जात नाहीत. यामुळे त्याला मोकळीच रिक्षा घेऊन परत यावे लागते. त्याचा काही प्रमाणात भार प्रवाशांवर पडतो. याशिवाय प्रत्येक वसाहतीत रिक्षानाक्यावर दुसऱ्या रिक्षाचालकाला उभे राहून दिले जात नाही. कळंबोली वसाहतीत हीच परिस्थिती आहे. जर एखाद्या रिक्षाचालकाने प्रवाशांना बसवले तर त्याला मारहाण केली जाते. मंगळवारी शिवसेना शाखेजवळील नाक्यावर अशीच घटना घडली. असे प्रकार वारंवार घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी खांदा वसाहतीतील शिवाजी चौकात दुसऱ्या रिक्षाचालकाने प्रवाशांना घेऊन जाण्यास मज्जाव केला नाही म्हणून एका स्थानिक रिक्षाचालकांनी त्याच नाक्यावरील दोन रिक्षाचालकांना मारहाण केली. अशा तक्रारी दररोज स्थानिक पोलीस ठाण्यात येतात. मात्र, त्यावर कारवाई होताना दिसत नाही.

रिक्षावाल्यांची मुजोरी मोडीत काढा

शेकापच्या जिल्हा चिटणीस मंडळाच्या महिला सदस्या वंदना तानजी बामणे यांनी याबाबत पनवेल आरटीओला पत्र दिले आहे. रिक्षानाक्यावर इतर रिक्षाचालकांची नाकेबंदी करणाऱ्या संबंधित रिक्षाचालकांची मक्तेदारी, मुजोरी मोडीत काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबाबत योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई व कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी बामणे यांनी केली आहे.

कोणताही रिक्षावाला कुठेही व्यवसाय करू शकतो. ठरावीक रिक्षावाल्यांनीच त्या ठिकाणी प्रवासी भरावे, असे काही नाही. तिथे इतरांना मज्जाव संबंधित रिक्षावाले करू शकत नाही, अशा तक्र ारी आल्या तर वाहतूक पोलिसांच्या मदतीने संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच रिक्षाचालकांबरोबर संवाद साधून त्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला जाईल.- हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल.

Web Title: The monopoly of the drivers on the rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.