सुरक्षा अधिकाऱ्यांची मक्तेदारी; मार्केट यार्डमध्ये एकाधिकारशाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:59 AM2023-11-23T10:59:32+5:302023-11-23T11:01:07+5:30
राजकीय दबाव आणून बदली
नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरक्षा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रत्येक मार्केटमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. अनेकांची १० ते २० वर्षे बदलीच झालेली नाही. बदलीचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. बदली केलीच तर राजकीय दबाव आणून ती थांबविली जात असल्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे.
सुरक्षा विभागाला शिस्त राहिलेली नसून, त्यामुळे बाजार समितीमध्ये अवैध गुटखा, अमली पदार्थांची विक्री व इतर गुन्हेगारांना आश्रय मिळू लागला आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठी सहकारी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाच प्रमुख मार्केट, एक विस्तारित मार्केट, मध्यवर्ती सुविधागृह, शीतगृह, निर्यात भवन असे विविध प्रकल्प आहेत. मार्केट परिसराच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन आहे. याच परिसरात पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्तांचे कार्यालय आहे.
राजकीय दबाव आणून बदली
भाजीपाला, फळ, धान्य व इतर मार्केटमध्येही अनेकजण कायमस्वरूपी याच मार्केटमध्ये नियुक्ती झाल्याच्या आविर्भावामध्ये काम करत आहेत.
सुरक्षा विभागामधील कर्मचाऱ्यांची बदली झाली की लगेच संबंधित कर्मचारी राजकीय दबाव आणून बदली थांबवत आहेत. आमदार, मंत्री व इतर वजनदार व्यक्तींचा फोन आला की बदली लगेच रद्द केली जात आहे. अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच शिफ्टमध्ये काम करत आहेत.
ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेमुळे निर्माण झालेले प्रश्न
पाचही मार्केटमध्ये गुटख्याची बिनधास्त विक्री
भाजीपाला व फळ मार्केटमध्ये छुप्या पद्धतीने गांजा विक्री
फळ व भाजी मार्केट परिसरामध्ये देहविक्री करणाऱ्यांचा वावर वाढू लागला आहे. भाजीपाला, फळ, मसाला मार्केटमध्ये विनापरवाना मुक्काम करणाऱ्या अनोंदीत कामगारांची संख्या वाढली.
बाजार समितीच्या कामकाजामध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे. सुरक्षा विभागामधील कर्मचाऱ्यांच्याही लवकरच बदल्या करण्यात येणार आहेत. बदलीच्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल.
- पी. एल. खंडागळे, सचिव बाजार समिती