मुरु ड-अलिबाग रस्त्याची दुरवस्था
By admin | Published: March 28, 2017 05:24 AM2017-03-28T05:24:41+5:302017-03-28T05:24:41+5:30
मुरु ड ते अलिबाग या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून खड्ड्यातून रोज प्रवास करावा लागल्याने
नांदगाव/ मुरु ड : मुरु ड ते अलिबाग या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून खड्ड्यातून रोज प्रवास करावा लागल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील इतर काही रस्ते तयार झाले परंतु या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेली एसटी या मार्गावर धावत असली तरी यामुळे एसटीचे नुकसान होत आहे.
येथील काही रस्त्याला फक्त कार्पेट केले तरी हे रस्ते सुस्थितीत होऊ शकतात, परंतु सार्वजनिक बांधकाम खाते यावर कोणतीही उपाययोजना करण्यास तयार नाही. कोणताही राजकीय नेता या रस्त्यांकडे गांभीर्यपूर्वक पाहत नाही, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांचे देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्याला आता कोणीही वाली राहिला नाही, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दोन ते तीन महिन्यांवर पावसाळा आला असून सुद्धा या रस्त्याबाबत बांधकाम खात्याची भूमिका काय हे अद्याप स्पष्ट न झाल्याने हे रस्ते होणार तरी कधी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
मुरु ड ते अलिबाग हे अंतर ४८ किलोमीटर असून एसटीने प्रवास केल्यास अलिबाग येथे पोहचण्यासाठी अडीच तास लागतात,तर खासगी गाडीने दोन तास लागतात. वावे मार्गे प्रवास करावा लागत असल्याने व येथे खड्डे असल्याने या ठिकाणी पोहचण्यास खूप वेळ लागत आहे. रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे असे फक्त ऐकिवात येते, परंतु आलेला निधी रस्त्यावर खर्च होताना दिसत नसल्याने हे रस्ते होणार तरी कधी हा प्रश्न येथे नागरिकांकडून विचारला जात आहे. मुरु ड ते साळाव हा रस्ता १९९२ साली तयार करण्यात आला. हे अंतर ३२ किलोमीटर एवढे आहे, परंतु आजतागायत या रस्त्याने कधीच कार्पेट न अंथरल्याने आता हे सुद्धा रस्ते खराब होत आहेत.