मोरबे धरण कोणत्याही क्षणी भरणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:41 AM2018-07-22T00:41:23+5:302018-07-22T00:42:15+5:30
नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण ८७.२५ मीटरपर्यंत भरले आहे.
खोपोली/ नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण ८७.२५ मीटरपर्यंत भरले आहे. कोणत्याही क्षणी धरण भरून दरवाजे उघडावे लागणार आहेत. त्यामुळे धारवी नदीकिनाऱ्यालगतच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये एक महिना आधीच धरण भरणार आहे.
नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यातही एक महिन्यापासून सातत्याने पाऊस पडत असून या परिसरातील सर्व धरणांची पाणीपातळी वाढली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या मोरबे धरण परिसरामध्ये आतापर्यंत २२५८ मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. धरणाणामध्ये ८८ मीटर एवढी पाणी साठविण्याची क्षमता असून शनिवारी सकाळपर्यंत ८७.२५ मीटर एवढी नोंद झाली आहे.
पुढील एक ते दोन दिवसांमध्ये धरण पूर्णपणे भरणार असून, धरणाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत. दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता असल्यामुळे धारवी नदीपात्राच्या बाजूला राहणाºया ग्रामस्थांना सकर्ततेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रामध्ये मासेमारी किंवा इतर कामांसाठी जाऊ नये, असे सूचित करण्यात आले आहे.
महानगरपालिकेचे धरण २०१३ मध्ये १४ आॅगस्टला भरले होते. २०१७ मध्ये २९ आॅगस्टला धरण भरले होते. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जुलैमध्येच धरण भरणार आहे.