- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
रात्री-अपरात्री घरी परतणाऱ्या नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. संपूर्ण शहरात सुमारे तीन हजार कुत्रे आहेत. निर्बीजीकरणावर दरवर्षी दीड ते दोन कोटी रुपये खर्च होत असले तरी कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे समोर येत आहे. भरदिवसा लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी तर प्रत्येक विभागातल्या रस्त्यावर मोठ्या संख्येने भटके कुत्रे फिरत असतात. हे कुत्रे रात्रीच्या वेळी दुचाकीचालकांच्या मागे लागत असल्याने अपघाताच्या घटनाही शहरात घडल्या असून, यात अनेक जण जखमी झाले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भटक्या श्वानांविषयी चीड निर्माण झालेली आहे.महापालिकेतर्फे २०१२ मध्ये झालेल्या श्वान गणनेनुसार शहरात २९ हजार ८६४ श्वान आहेत. मात्र मागील तीन वर्षांत यात मोठी वाढ झाली आहे. भटके कुत्रे मारण्यावर बंदी असल्याने महापालिकेकडून निर्बीजीकरण करण्यात येते असून, इन डिफेन्स अॅनिमल या संस्थेमार्फत पालिका हे काम हाताळत आहे. संस्थेला प्रतिश्वान ४०० रुपये दिले जातात. त्यानुसार दरवर्षी महापालिका क्षेत्रातून सुमारे साडेचार ते पाच हजार श्वान पकडले जात असून त्यांच्यावर दीड ते दोन कोटी रुपयांचा खर्च होत आहे. अशाप्रकारे या संस्थेने मागील ८ वर्षांत ३४ हजार ५०० श्वानांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केलेली आहे. एकूण ३४ हजार श्वानांवर सुमारे १६ कोटी रुपयांचा खर्च पालिकेने संस्थेच्या माध्यमातूून केलेला आहे.महापालिकेच्या आठ विभागांतून प्रतिवर्षी ३०० ते ५०० श्वान पकडले जात आहेत. यानंतर त्यांचे निर्बीजीकरण करून पुन्हा त्याच परिसरात सोडले जाते. मात्र वर्षानुवर्षे होणाऱ्या निर्बीजीकरणानंतरही विभागनिहाय वाढती श्वानांची संख्या पाहून पालिकेच्या मोहिमेबाबत नागरिकांना प्रश्नचिन्ह पडत आहे. दिवसा सहसा न दिसणारे कुत्रे रात्रीच्या वेळी मात्र समूहाने रस्त्यावर फिरत असतात. अनेकदा त्यांची संख्या व आक्रमकता पाहून नागरिकांनाही आपला मार्ग बदलावा लागतो. त्यामुळे कुत्रे पकडण्याची कारवाई रात्रीदेखील करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.