अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर धाडसत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 12:10 AM2019-01-28T00:10:19+5:302019-01-28T00:11:50+5:30

वर्षभरात ५९४ किलो गांजा जप्त; पनवेलमधून १४ आरोपी केले गजाआड

For more information, please see | अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर धाडसत्र

अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर धाडसत्र

Next

नवी मुंबई : गुन्हे शाखा व अमली पदार्थ विरोधी पथकाने पनवेल परिसरामधील अड्ड्यांवर धाडसत्र सुरू केले आहे. वर्षभरामध्ये तब्बल ५९४ किलो गांजा जप्त केला असून, २ किलो २४५ ग्रॅम वजनाचे चरसही हस्तगत केले आहे. आतापर्यंत १४ आरोपींवर गुन्हे दाखल केले असल्यामुळे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहे.

नवी मुंबई, पनवेल, उरण परिसर अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी २०१६ मध्ये पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. तेव्हापासून गुन्हे शाखा व अमली पदार्थ विरोधी पथकाने धाडसत्र सुरू करून तीन वर्षांमध्ये ५० पेक्षा जास्त अमली पदार्थ विक्रेत्यांना तुरुंगात पाठविले आहे. नवी मुंबई परिसरामध्ये सर्वाधिक कारवाई झाली होती. एपीएमसी, तुर्भे, नेरूळ, सीबीडी व इतर ठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू असलेले अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. गांजासह, कोकेन, चरस, एमडी पावडर व इतर अमली पदार्थही हस्तगत केले होते. परिमंडळ एकमध्ये कारवाईचा धडाका सुरू केल्यामुळे अनेकांनी अवैध व्यवसाय पनवेल परिसरामध्ये सुरू केला होता.

रिमंडळ दोनमध्ये अनेक ठिकाणी खुलेआम गांजाची विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होऊ लागल्या होत्या. दक्षिणेकडून राज्यांमधून व राज्याच्या इतर भागातून रायगड व इतर ठिकाणी गांजासह इतर अमली पदार्थ विक्रीसाठी येऊ लागले होते. यामुळे २०१८ च्या सुरुवातीपासूनच पनवेल परिसरावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. मार्च महिन्यात सलग दोन दिवस धडक मोहीम राबवून ४७७ किलो गांजा हस्तगत केला होता.

खारघरमध्ये २५ डिसेंबरला महानगरपालिकेने अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली असताना गांजा आढळून आला होता. यानंतर पनवेल परिसरामधील अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली होती. यानंतर गुन्हे शाखा व अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन महिन्यांमध्ये पनवेल परिसरामध्ये लक्ष केंद्रित केले आहे. कारवाईचा धडाका सुरू केला आहे. २२ जानेवारीला जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शेडूंग फाट्यावर कारवाई करून तब्बल १०८ किलो वजनाचा गांजा व २ किलो २४५ ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले आहे. तब्बल ४७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असून चार आरोपींना अटक केली आहे. कारवाईमुळे अवैध व्यवसायांना आळा बसला आहे.

१०० किलो गांजा
मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने २३ मार्च रोजी पनवेल - मुंब्रा महामार्गावर धाड टाकून एमएच ०२ जेपी ९४३० कारमधून तब्बल १०० किलो गांजा हस्तगत केला होता. अमीर अहमद, सिराज चौधरी व मोहम्मद सिद्धिकी या तिघांना अटक केली होती. त्यांनी आंध्रप्रदेशमधून गांजाविक्रीसाठी पनवेलमध्ये आणला होता.

महामार्गावर कारवाई
अमली पदार्थ विरोधी पथकाने २२ मार्चला मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचून सोलापूर परिसरातून रायगडमध्ये गांजा घेऊन जाणारा टेम्पो व कार ताब्यात घेतली. पोलिसांनी महेश व्हटकर व संताजी खरात यांना अटक करून ५६ लाख रुपये किमतीचा तब्बल ३७७ किलो गांजा हस्तगत केला होता.

पनवेल ग्रामीणमध्ये धाड
गुन्हे शाखेच्या पथकाने ३० नोव्हेंबरला पनवेल परिसरातील भल्याची वाडी परिसरामध्ये धाड टाकून गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला होता. तेथे एका महिलेला अटक केली असून ४०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला होता.

Web Title: For more information, please see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.