- प्राची सोनवणेनवी मुंबई परिसरातील झोपडपट्टी वसाहतींमधील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून आजतागायत सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्यासाठी तुर्भे परिसरातील ‘आरंभ’ ही सामाजिक संस्था कार्यरत आहे. उच्च पदवीधर असलेल्या शोभा मूर्ती यांनी गलेलठ्ठ पगाराच्या सीएच्या नोकरीचा त्याग करत साक्षरतेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले.१९९७ साली या संस्थेची सुरुवात झाली. सुरुवातीला शहरातील झोपडपट्टी परिसरातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या वंचित मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी शोभा मूर्ती यांनी त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तुर्भे परिसरात शाळा सुरू केली. सुरुवातीला अनेक आव्हाने पेलत विद्यार्थी गोळा करावे लागले. पहिल्या दिवशी शाळेत आले की दुसºया दिवशी तो विद्यार्थी गायब. मग पुन्हा त्या विद्यार्थ्याला शोधून शाळेत बसवायचे, असा हा ठरलेला दिनक्रम, असे मूर्ती यांनी सांगितले. हळूहळू येथील विद्यार्थी आणि पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले आणि त्यानंतर कामावर जाताना पालक मुलांना शाळेत सोडून जात असल्याचे मूर्ती यांनी सांगितले. या वेळेत या विद्यार्थ्यांना गणित, मराठी, हिंदी, विज्ञान आदी विषयांचे धडे देण्यात आले. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या झोपडपट्टी भागात शिक्षणाला कवडीमोल महत्त्व दिले जात नाही अशा ठिकाणी शाळा सुरू करून तेथील विद्यार्थ्यांना साक्षर करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आणि अशा वेळीकुटुंबाने मोलाची साथ दिली याचा खूप अभिमान वाटत असल्याचेही मूर्ती यांनी सांगितले.आरटीईअंतर्गत झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश मिळवून देण्यात आला आहे. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी दिली जाते तर ज्यांना अभ्यासासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही अशा गरजंूना येथे अभ्यासासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. शालेय साहित्य, गणवेश तसेच रोजचा डबादेखील या संस्थेच्या माध्यमातून पुरविला जातो. कोणत्याही कारणामुळे या मुलांना शिक्षणासाठी अडचण येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते. शहरातील दानशूर व्यक्तींकडून या संस्थेला निधी स्वरूपात धान्य, भाज्या, फळे दिली जातात, जेणेकरून या विद्यार्थ्यांना रोजचा जेवणाचा डबा दिला जाईल. बालवाडीपासून ते दहावीपर्यंत सध्या १११६ विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत.संस्थेतून बाहेर पडलेली मुले आज नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. तर काही विद्यार्थी या संस्थेत ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. तुर्भे, रबाळे एमआयडीसी, दिघा, घणसोली, नेरूळ, यादवनगर, तुर्भे नाका अशा सहा ठिकाणी या संस्था कार्यरत आहेत.महिलांना स्वयंरोजगारसातारा जिल्ह्यातील चौदा गावांमधील महिलांना शिवण क्लास, पापड,लोणची तयार करणे, हस्तकलेच्यावस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिलेजाते. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवून या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. संस्थेच्या वतीने लातूरमध्येही शेतकºयांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली जाते.
मजुरांच्या सात हजारांहून अधिक मुलांना दाखविली शिक्षणाची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 1:24 AM