आगीतून सत्तरहून अधिक जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 12:20 AM2021-03-05T00:20:46+5:302021-03-05T00:21:00+5:30
डम्पिंग ग्राऊंडला लागली होती आग : अनधिकृत तबेल्यासाठी ग्राऊंड आंदण, प्रशासनाची डोळेझाक
सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिकेचे तुर्भे येथील डम्पिंग ग्राऊंड तबेले चालकांसाठी आंदण दिल्याची बाब समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री त्याठिकाणी लागलेल्या आगीमुळे ही बाब प्रकाशात आली. यादरम्यान अग्निशमन दलाने तेथून वेळीच ७० हून अधिक जनावरांची सुटका केल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.
मंगळवारी मध्यरात्रीच्यासुमारास डम्पिंग ग्राऊंडमध्ये मोठी आग लागली होती. कचऱ्यामुळे ही आग अधिकच पसरल्यामुळे ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे पाच तास प्रयत्न करावे लागले. यादरम्यान वाशी व कोपर खैरणे अग्निशमन दलाने दाखवलेल्या कौशल्यामुळे बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास आग आटोक्यात आली. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास आग लागली असता, काही वेळातच अग्निशमन दलाला त्याची माहिती मिळाली. त्यानुसार अग्निशमन जवान घटनास्थळी दाखल झाले होते.
यावेळी डम्पिंग ग्राऊंडच्या आतील भागात एका बाजूला मोठा तबेला असून, त्यात ७० हून अधिक जनावरे अडकली असल्याची बाब अग्निशमन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यात काही लहान वासरांचा समावेश होता. आगीच्या झळा या जनावरांपर्यंत पोहोचत असल्याने त्यांची सुटकेसाठी धडपड सुरू होती.
परंतु तबेला सर्व बाजूने बांबूने बंदिस्त असल्याने व जनावरे रस्सीने बांधलेली होती. त्यामुळे अग्निशमन जवानांनी तात्काळ या जनावरांचे दोर कापून त्यांची सुटका करून त्यांना डम्पिंगच्या बाहेर आणले. अन्यथा या सर्व जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता.
या घटनेमुळे डम्पिंग ग्राऊंडमध्ये चालणारा अनधिकृत तबेला प्रकाशात आला आहे. अनेक महिन्यांपासून त्याठिकाणी हा तबेला चालवला जात होता, असे परिसरातील नागरिकांकडून समजले.
त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची त्यास मूकसंमती होती, याची
शक्यता नाकारता येत नाही. डम्पिंगला लागूनच मोठ्या प्रमाणात
भंगाराचे गोडावून तयार झाले
आहेत. त्यापासून भविष्यात
मोठ्या आगीचा धोका
असतानाही त्यांना कारवाईत अभय मिळत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
थोडक्यात टळली
मोठी दुर्घटना
डम्पिंग ग्राऊंडला लागलेलीच आग तब्बल पाच तास धुमसत होती. त्यावर वेळीच नियंत्रण मिळवले गेले नसते, तर काही अंतरावरील कंपन्यांनाही आगीचा धोका निर्माण झाला होता. परंतु डम्पिंग बाहेर आग जाणार नाही, याची खबरदारी घेत अग्निशमन दलाने नियोजनबद्धरित्या आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य धोका टळला.
राजकीय वरदहस्त
डम्पिंग ग्राऊंडमध्ये पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त खासगी व्यक्तींना प्रवेश नसतानाही आतमध्ये तबेला कसा उभारला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हा तबेला पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून एका राजकीय व्यक्तीमार्फत चालवला जात होता. त्यामुळे संबंधित सर्वांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात पालिका आयुक्तांशी संपर्क साधला असता तो झाला नाही.