नवी मुंबई : नेव्हीत नोकरीच्या बहाण्याने दुबईला पाठवून २० हून अधिक तरुणांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. प्रत्येकी ३ ते ५ लाख रुपये घेऊन तरुणांना नोकरी लागल्याचे सांगून दुबईला पाठवले होते. प्रत्यक्षात तिथे गेल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तातडीने या तरुणांनी भारतात परत येऊन झालेल्या फसवणूक प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
नेरूळ एमआयडीसीमध्ये सुरू केलेल्या एक्स.पी.ओ. शिपिंग मॅनेजमेंट कार्यालयाच्या माध्यमातून देशभरातील तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे. या कंपनीचा प्रमुख नारायण झा व त्याच्या सहकाऱ्यांनी विविध राज्यांतील तरुणांना जाहिरातीद्वारे संपर्क साधून दुबईत शिपिंगमध्ये नोकरीची संधी असल्याचे भासवले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी एमआयडीसीमधील कार्यालयात संपर्क साधला होता. यावेळी त्यांना प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन दुबईत नोकरी निश्चित झाल्याचे सांगितले होते. २७ जानेवारीला त्यांना प्रत्यक्ष दुबईलाही पाठविले.
दुबईत पाठवलेल्या तरुणांना तिथे नोकरी ठरल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र तिथे गेल्यावर संबंधित कंपनी अस्तित्वात नसल्याचे समोर आले. यापूर्वी देखील काही फसव्या कंपन्यांकडून असे प्रकार झाले आहेत.
नोकरीच्या बहाण्याने तरुणांना दुबईला पाठवून फसवणूक झाल्याची तक्रार आली आहे. फसवणूक झालेल्या तरुणांचे जबाब नोंदवणे सुरू असून, संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे - आबासाहेब पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाणे.
५० लाखांचा अपहार?
तेथे भेटलेल्या एका व्यक्तीने त्यांच्याकडून ठराविक रक्कम घेऊन त्यांना स्वतःच्या खर्चाने हॉटेलमध्ये राहण्यास सांगितले. तीन दिवस दुबईत राहिल्यानंतर कोणीही संपर्क करत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुबईत कायदेशीर अडचणीत अडकण्यापूर्वी तरुणांनी परतीचे तिकीट काढून ३१ जानेवारी रोजी भारत गाठला. तरुणांनी सोमवारी तुर्भे एमआयडीसी पोलिसांत फसवणुकीची तक्रार केली. तरुणांना दुबईत पाठवून संबंधितांनी कार्यालय बंद करून धूम ठोकली आहे. ५० लाखांहून अधिक रकमेच्या अपहाराची शक्यता आहे.