मधुकर ठाकूर -
उरण : नागपंचमी सणाच्या निमित्ताने चिरनेर-उरण कलानगरातुन तीन हजारांहून अधिक नागाच्या मुर्ती मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आल्या असल्याची माहिती चिरनेरच्या मुर्तीकार दीपा गोरे यांनी दिली. श्रावणातच येणाऱ्या नागपंचमीच्या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीनुसार येथील स्त्रिया पारंपारिक वेशभूषा करून नागाची मूर्ती पाटावर ठेवून तिची घरच्याघरी विधीवत पूजा करतात. ग्रामीण भागातल्या स्त्रिया तर अजूनही शेतावरच्या नागाच्या स्थानावर जाऊन विधिवत पूजा करतात. यावेळी रानातल्या नागवेलीला महत्व देऊन, त्या नागवेलीची देखील महिला पूजा करतात. यावेळी नारळ, पुष्पहार, दूध, पेढे आणि लाह्या या देवतेला प्रसाद म्हणून अर्पण करतात. मागील अनेक पिढ्यांची परंपरा जोपासत यावर्षीही चिरनेर कला नगरीतील कुंभार समाजाच्या महिला कारागिरांनी तयार केलेल्या हजारो नागमूर्ती मुंबईच्या बाजारात तीन दिवस अगोदरच विक्रीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. गणेशमूर्ती, नागमूर्ती, मातीची भांडी तयार करण्याचा कुंभार समाजाचा पारंपारिक व्यवसाय आहे. हिंदू संस्कृतीच्या विविध सण उत्सवांमुळे या धंद्यात चार पैसे मिळतात. मात्र मेहनत खूप करावी लागते. दोन महिने आधीपासून आम्ही नागमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतो. लहान मोठ्या नागमूर्ती या किरकोळ भावाच्या दराने शंभर ते पन्नास किंवा चाळीस रुपये या दराने विकल्या जातात. नागपंचमीच्या सणासाठी मुंबईच्या बाजारात येथील नागाच्या मुर्तीना मोठी मागणी असते.दरवर्षी चिरनेरच्या कलानगरातुन तीन हजारांहून अधिक छोट्या- मोठ्या आकाराच्या नागाच्या मुर्ती मुंबईच्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती मुर्तीकार दीपा दीपक गोरे यांनी दिली .