नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्यांना विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २४९ शाळांतून ३५ हजाराहून अधिक विद्यार्थी या विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये सहभागी झाले असून सर्व स्पर्धा जल्लोषात पार पडल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार राज्यातील सर्व महानगरपालिकांना आपापल्या क्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांकरिता स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील गुणवंत खेळाडूंना थेट विभागीय स्तरावर आपल्या गुणवत्तापूर्ण खेळाचे प्रदर्शन घडविणे शक्य झाले आहे. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते नेरूळ सेक्टर १९ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल मैदानात प्रारंभ झाल्यानंतर ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन येथे संपन्न झालेल्या बुध्दीबळ व बॅडमिंटन स्पर्धा नेटक्या आयोजनात नियोजनबध्द रितीने संपन्न झाल्या.
त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथील नॉर्थ पॉईंट स्कुलमध्ये व्हॉलीबॉल स्पर्धा, वाशीतील फादर ॲग्नेल स्कुलमध्ये जलतरण, रायफल शुटिंग, हॉकी, टेबल टेनिस स्पर्धा, विद्याभवन शिक्षण संकुल नेरुळ येथे योग व नेटबॉल स्पर्धा, नेरुळ जिमखाना येथे लॉन टेनिस स्पर्धा, क्राईस्ट अकॅडमी कोपरखैरणे येथे बास्केटबॉल व सेपक टकरा, एपीजे स्कुल नेरुळ येथे थ्रो बॉल, विब्गोयोर स्कुल ऐरोली येथे ज्युडो स्पर्धा, वारकरी भवन सी.बी.डी. बेलापूर येथे कुस्ती तसेच राजीव गांधी स्टेडियम, सी.बी.डी. बेलापूर येथे सॉफ्टबॉल व आट्यापाट्या स्पर्धा संपन्न झाल्या.
या सर्व स्पर्धांना भरघोस प्रतिसाद लाभला आहे. याशिवाय उर्वरित खेळांच्या शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजनाविषयी क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आगामी काळात सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये १४, १७ व १९ वर्षाआतील विविध वयोगटामध्ये २४९ शाळांमधून ३५ हजारहून अधिक मुले व मुलींनी सहभाग घेतलेला होता. या सर्व स्पर्धांच्या आयोजनामध्ये बारकाईने लक्ष देत प्रत्येक ठिकाणी भेटी देऊन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त ललिता बाबर खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत.
मागील १० वर्षाच्या तुलनेने स्पर्धेमध्ये सर्वाधिक खेळाडूंचा संघांचा सहभाग दिसून येत आहे. विशेषत: महानगरपालिका शाळांमधूनही विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये मोठया प्रमाणात खेळाडू सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त करीत आहेत तसेच पुढील मुंबई विभागीय, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र होताना दिसत आहेत. अशाप्रकारे उत्तम स्पर्धा आयोजनाबद्दल क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक व पालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या स्पर्धेतून विजयी झालेल्या तसेच विभागीय स्तरावर खेळण्यासाठी पात्र झालेल्या खेळाडूंना शुभेच्छाराजेश नार्वेकर, आयुक्त, न.मुं.म.पा.