नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. जुहूगाव, रबाळे, सानपाडा, घणसोली व वाशीमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. जवळपास ८ नागरी आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात एक महिन्यात रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. प्रत्येक नोडमध्ये रुग्ण वाढत असून प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान महानगरपालिका प्रशासनासमोर उभे राहिले आहे. नवी मुंबईमध्ये ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. परंतु फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णांचा आलेख प्रतिदिन वाढू लागला आहे. कोरोना नियंत्रणाच्या अभियानामध्ये आतापर्यंत नागरी आरोग्य केंद्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २३ केंद्रांच्या माध्यमातून परिसरात जनजागृती करण्यापासून सर्व उपक्रम प्रत्येक घरात पोहोचविण्याचे काम केले जात आहे. रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्याचे कामही आरोग्य केंद्रातील कर्मचारी करत आहेत. यापूर्वी इंदिरानगर व चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राचा परिसर कोराेनामुक्त झाला होता. परंतु फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आलेल्या लाटेमुळे या विभागांमध्येही रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. एक महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या ७६२ वरून १४३० वर पोहोचली आहे. ८ विभागांत सक्रिय रुग्णांच्या प्रमाणात दुप्पट वाढ झाली आहे. सद्य:स्थितीमध्ये जुहूगावमध्ये सर्वाधिक १३७ सक्रिय रुग्ण आहेत. रबाळेमध्ये १३२, सानपाडामध्ये १२६, घणसोलीत ११५ व वाशीगाव नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात १०३ रुग्ण आहेत. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पुन्हा नागरी आरोग्य केंद्राच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप सक्रिय करण्यास सांगितले आहे. रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या आरोग्यावरही लक्ष ठेवले जात आहे. कोरोनाविषयी नियमांचे उल्लंघन करणारांवर कारवाई केली जात आहे. नियम तोडणाऱ्या हॉटेल चालकांवरही गुन्हे दाखल केले जात आहेत. नागरिकांनीही नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
इलठाणपाडात संख्या झाली कमीइलठाणपाडा व कुकशेत नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात एक महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ५ फेब्रुवारीला कुकशेतमध्ये ४३ सक्रिय रुग्ण होते ते कमी होऊन ४० झाले आहेत. इलठाणपाडामध्ये ही संख्या १० वरून पाचवर आली आहे. याच पद्धतीने इतर विभागांतही रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.