कोरोनामुळे नवीन पनवेल, कामोठेमध्ये सर्वाधिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:32 PM2020-09-22T23:32:28+5:302020-09-22T23:32:38+5:30
महापालिकेची चिंता वाढली : इमारतीमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे बळी जाणाऱ्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पालिका क्षेत्रात नवीन पनवेल, कामोठे, पनवेलमध्ये सर्वाधिक कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. सोमवारपर्यंत येथे कोरोनामुळे ३७१ जणांचा बळी गेला आहे.
पनवेल महापलिका क्षेत्रात विशेषत: इमारतीमध्ये कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या दोन महिन्यांत पालिका प्रशासनास कोरोना संसर्गाला रोखण्यात यश आले होते. मात्र, सप्टेंबर महिन्यात कामोठे, खारघर, नवीन पनवेल, कळंबोली या परिसरात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत आहे. नवीन पनवेल, कामोठे, पनवेल या परिसरात कोरोनामुळे सर्वाधिक बळी गेले आहेत.
सोमवारपर्यंत पनवेल पालिका क्षेत्रात १६,६९२ जणांना कोरोनाची लागन झाली आहे, तर ३७१ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. यात सर्वाधिक नवीन पनवेल येथे ९० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर, कामोठे परिसरात ८५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. पनवेल शहरात ६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडण्यात कोरोनाबाधितांना सुविधा, तसेच आॅक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेडची कमतरता, कोरोनाबाबत अज्ञानता, बेड शोधण्यात जाणारा वेळ, वेळेवर न मिळणारी अॅम्बुलन्स या सर्व बाबी कारणीभूत आहेत. दिवसेंदिवस वाढते रुग्ण आणि मृत्युमुखी पडणाºया संखेत वाढ होत असल्यामुळे महापालिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे.