नेरुळ, बेलापूर विभागात सर्वाधिक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:33 AM2020-09-24T00:33:30+5:302020-09-24T00:33:43+5:30
सीबीडीतील घरे, दुकानांमध्ये शिरले पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात मंगळवारी रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला असून, शहरातील नेरुळ आणि बेलापूर विभागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शहरात विविध ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या असून, सीबीडी विभागातील घरे आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. रात्रभरात शहरात सुमारे २२२.८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसात नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मंगळवारी रात्री झालेल्या पावसाचा सीबीडी विभागाला मोठा फटका बसला असून, सीबीडी सेक्टर ३, सेक्टर ४, सेक्टर ६, बेलापूर गाव, कोकण भवन, सिडको भवन आदी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. सोसायट्यांमध्येही पाणी जमा झाल्याने सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमध्ये पाणी शिरले. नेरुळ पोलीस ठाणे आणि जुईनगर सेक्टर २३ भागातील झाडे कोसळली. महापालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या माध्यमातून झाडे हटविण्यात आली. शहरात सर्वाधिक पाऊस नेरुळ विभागात पडला असून, २८८.५० मिमी पासवाची नोंद झाली आहे. बेलापूर २७८.४० मिमी, वाशी १८६.३० मिमी, कोपरखैरणे १८२.३० मिमी, ऐरोली १७८.८० मिमी पाऊस झाला.
मीटर रूमला आग : सीबीडी सेक्टर १५ मधील सोसायटीच्या मीटर रूममध्ये शॉटसर्किटची घटना घडल्याने आग लागली होती. अग्निशमन दलाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
कोकण भवन कार्यालयाच्या आवारात तळे
सीबीडी येथील कोकण भवनच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले.
होल्डिंग पाँडजवळ साचलेला गाळ आणि खारफुटीमुळे सीबीडीतील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. दरवर्षी ही समस्या उद्भवते. सीबीडी सेक्टर ४ आणि ६ भागातील बाजारपेठेत पाणी शिरल्याने ३० ते ४० कोटींच्या मालाचे नुकसान झाले आहे. यासाठी शासनाबरोबर महापालिका जबाबदार आहे.
- प्रमोद जोशी, सरचिटणीस,
व्यापारी महासंघ, नवी मुंबई