नवी मुंबईत कारच्या धडकेत आई, मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 02:42 AM2019-06-05T02:42:45+5:302019-06-05T02:42:51+5:30
नेरूळ येथे या सर्व्हिस रोडच्या पदपथावर अमोल पाटील, त्यांची आई ललिता आणि नात असे तिघे जण रात्री ११ वाजण्याच्या सुमारास फिरायला आले होते.
नवी मुंबई : पामबीच मार्गालगतच्या सर्व्हिस रोडच्या पदपथावर बसलेल्या आई, मुलगा आणि नातीला एका वेगवान कारने जोरदार धडक दिली. यात आई व मुलाचा मृत्यू झाला आहे, तर लहानगी नात गंभीररीत्या जखमी झाली आहे. सोमवारी रात्री नेरूळ सेक्टर ५० येथे ही दुर्घटना घडली आहे.
नेरूळ येथे या सर्व्हिस रोडच्या पदपथावर अमोल पाटील, त्यांची आई ललिता आणि नात असे तिघे जण रात्री ११ वाजण्याच्या सुमारास फिरायला आले होते. आई व नात पदपथावर उभे होते तर अमोल आपल्या स्कूटीवर बसून त्यांच्याशी गप्पा मारत होता. त्याच वेळी एका वेगवान कारने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अमोल जागीच ठार झाला तर ललिता आणि नातीला जखमी अवस्थेत वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी ललिता यांचा मृत्यू झाला. सध्या जखमी नातीवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले आहेत. या दुर्घटनेला जबाबदार असलेला कारचा चालक मोहमद इस्माईल याला एनआरआय पोलिसांनी अटक केली आहे.