मुलींना मारून मातेची आत्महत्या
By Admin | Published: November 26, 2015 03:31 AM2015-11-26T03:31:27+5:302015-11-26T03:31:27+5:30
आपल्या दोन चिमुकल्या मुलींना पंख्याला लटकवून ठार मारल्यानंतर एका तीस वर्षीय विवाहितेने दुसऱ्या पंख्याला गळफास घेऊन स्वत:ही आत्महत्या केली
नवी मुंबई : आपल्या दोन चिमुकल्या मुलींना पंख्याला लटकवून ठार मारल्यानंतर एका तीस वर्षीय विवाहितेने दुसऱ्या पंख्याला गळफास घेऊन स्वत:ही आत्महत्या केली. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे घडली.
जागृती हिरजी वाविया असे या मृत महिलेचे नाव असून, पतीबरोबर झालेल्या किरकोळ भांडणाचा राग येऊन तिने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कोपरखैरणे सेक्टर १९ येथील हरी प्रिया इमारतीच्या खोली क्रमांक २0३ मध्ये जागृती पती हिरजी आणि वंशिका (दीड वर्ष) व धृविया (५) या दोन चिमुकल्या मुलींसोबत राहत होती. तिच्या पतीला मतदानासाठी गुजरात येथे जायचे होते. त्याला जागृतीचा विरोध होता. त्यानंतरही तो गुजरातला गेला. याच रागातून तिने मंगळवारी रात्री हे दुष्कृत्य केले. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ दिनेश गोठी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कोपरखैरणे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)