आईच्या वकिलीच्या पदवी परीक्षेचे अखेर मुलीनेच फोडले बिंग, ऑनलाइन परीक्षेतील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 11:18 AM2022-11-14T11:18:54+5:302022-11-14T11:19:18+5:30
कोरोनामुळे ऑनलाईन झालेल्या एलएलबीच्या परीक्षेत दुसऱ्यामार्फत परीक्षा देऊन पास झालेल्या आईविरोधात मुलीने तक्रार दिली आहे. मुंबईच्या एका पोलीस निरीक्षकाच्या मदतीने हा प्रकार घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.
नवी मुंबई : कोरोनामुळे ऑनलाईन झालेल्या एलएलबीच्या परीक्षेत दुसऱ्यामार्फत परीक्षा देऊन पास झालेल्या आईविरोधात मुलीने तक्रार दिली आहे. मुंबईच्या एका पोलीस निरीक्षकाच्या मदतीने हा प्रकार घडल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. त्याद्वारे नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबईत राहणाऱ्या व व्यवसायाने डॉक्टर असलेल्या मुलीने तिच्या आईविरोधात ही तक्रार केली आहे. आईचे मुंबईतील एका पोलीस निरीक्षकासोबत विवाहबाह्य संबंध असल्याने मुलगी ती वडिलांसोबत राहायला आहे. दरम्यान २०२० मध्ये तिच्या आईने लॉकडाऊन कालावधीत ऑनलाईन झालेल्या एलएलबीच्या परीक्षेत स्वतःची परीक्षा देण्यासाठी पोलीस निरीक्षकाच्या मदतीने उलवे येथील एका वकिलाचा वापर केला होता. काही पेपर उलवे येथे तर काही पेपर नेरुळमध्ये बसून मोबाईलवर देण्यात आले होते.
यासाठी संबंधित वकिलाने मोबाईलचा कॅमेरा बंद करून स्वतः पेपर सोडवून तक्रारदार यांच्या आईला उत्तम गुणांनी पास होण्यास मदत केली होती. मात्र हा प्रकार तक्रारदार यांना खटकत राहिल्याने अखेर त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार
केली आहे.
पोलिस असलेल्या प्रियकराच्या मदतीने....
डमी उमेदवारांमार्फत परीक्षा देऊन वकील बनलेल्या महिलेसह तिचा पेपर देणाऱ्या वकील व मुंबईच्या एका पोलीस निरीक्षकावर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनदा परीक्षा देऊनही उत्तीर्ण न होऊ शकलेल्या महिलेने, अखेर पोलीस प्रियकराच्या मदतीने एलएलबी पास होण्यासाठी ही शक्कल लढवल्याचे मुलीच्या तक्रारीवरून समोर आले आहे.