विद्यार्थिनींच्या मृत्यूमुळे शोककळा; नातेवाइकांची घटनास्थळी धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 10:59 PM2019-08-03T22:59:16+5:302019-08-03T22:59:30+5:30
बचाव कार्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचाही सहभाग
नवी मुंबई : फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी खारघरमधील धबधब्यावर गेलेल्या चार विद्यार्थिनींचा बुडून मृत्यू झाल्यामुळे नवी मुंबईवरही शोककळा पसरली आहे. हे वृत्त समजताच विद्यार्थिनींचे पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यामध्ये सहभाग घेतला होता.
एसआयईएस महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या व अभ्यासात हुशार असलेल्या या विद्यार्थिनींवर काळाने घाला घातल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऐरोली सेक्टर ३ मध्ये राहणाऱ्या श्वेता नंदी या विद्यार्थिनीचाही मृतांमध्ये समावेश आहे. श्वेताचे वडील टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अपघाताचे वृत्त समजताच कुटुंबामधील सर्वांनी पांडवकडा परिसरात धाव घेतली. कोपरखेरणे सेक्टर १७ मधील तन्वर अपार्टमेंटमध्ये राहणारी नेहा दामा ही सकाळी सात वाजताच कॉलेजला गेली. आई गीता दामाबरोबर तिचे साडेसात वाजता शेवटचे बोलणे झाले. यानंतर दुपारी नेहा धबधब्यामध्ये वाहून गेल्याचा फोन आल्यामुळे आई व इतर नातेवाइकांनी खारघरमध्ये धाव घेतली. सायंकाळपर्यंत तिचा मृतदेह सापडला नव्हता. या दुर्घटनेचे वृत्त समजताच नेरूळमधील सामाजिक कार्यकर्ते गणेश भगत, रवींद्र भगत, अक्षय काळे व इतरांनीही खारघरमध्ये जाऊन बचाव कार्यामध्ये सहभाग घेतला. अग्निशमन दलामधून त्यांना एक मुलगी खारघरमध्ये बुडाली असल्याची माहिती मिळाली. यानंतर सर्व जण घटनास्थळी पोहोचले. आरती नायर ही मुलगी नेरूळ सेक्टर १५ मधील राहणारी आहे.
मित्रांना बसला धक्का
एसआयईएस महाविद्यालयामधील विद्यार्थिनी ‘फे्रंडशिप डे’ साजरा करण्यासाठी खारघरमधील धबधब्यावर गेल्या होत्या. चारही विद्यार्थिनी अभ्यासात हुशार होत्या.
पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे व पाय घसरल्यामुळे त्या धबधब्यात पडल्या. या घटनेमुळे महाविद्यालयामधील व इतर मित्रांनाही धक्का बसला असून, अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.