लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरात विनापरवाना रिक्षा चालवल्या जात असतानाही त्यावर कारवाईला आरटीओ चालढकल करत असल्याचे दिसत आहे. वाढत्या विनापरवाना रिक्षांच्या संख्येमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विनापरवाना रिक्षांच्या आडून गुन्हेगारांना आश्रय मिळत असल्याने त्यांच्यावर कारवाईची नागरिकांची मागणी आहे.स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईची बोगस रिक्षांचे शहर, अशी दुसरी ओळख निर्माण होत चालली आहे. राज्यात विविध ठिकाणी भंगारात निघालेल्या रिक्षा नवी मुंबईत विनापरवाना चालवल्या जात आहेत. दिवसेंदिवस अशा विनापरवाना रिक्षांची संख्या वाढत चालल्याने प्रत्येक नोडमध्ये त्यांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. यामुळे विनापरवाना रिक्षा चालवणाऱ्यांकडून अधिकृत व प्रामाणिक रिक्षाचालकांनाही दमदाटी होत आहे. त्यांच्यात उघडपणे हाणामारीच्या देखील घटना घडत असताना आरटीओ मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नुकताच ठाणे येथे तरुणीसोबत रिक्षात घडलेल्या प्रकारानंतर ठाणे आरटीओने बोगस रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे; परंतु नवी मुंबईत अद्यापही बोगस रिक्षा सुरूच आहेत. यामुळे ठाण्याप्रमाणे नवी मुंबईत देखील घटना घडल्यानंतर आरटीओ व वाहतूक पोलीस कारवाईचा मुहूर्त शोधणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.सद्यस्थितीला नवी मुंबईतले सर्वच नोडमधील प्रमुख रस्ते रिक्षांनी व्यापले आहेत. त्यापैकी बहुतांश रिक्षा विनापरवाना चालवल्या जात आहेत. अद्यापही अनेक रिक्षांना मीटर बसवण्यात आलेले नाहीत, तर काही रिक्षा खासगी वापराच्या परवान्यावर प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. विनापरवाना रिक्षांची कागदोपत्री नोंदच नसल्यामुळे त्यामध्ये ठाण्यासारखी घटना घडल्यास गुन्हेगारांचा शोध घेणार कसा? हा गंभीर प्रश्न आहे. यामुळे हे शहर बोगस रिक्षांपासून मुक्त करावे अशी प्रवासी नागरिकांची मागणी आहे. त्यासंबंधीच्या तक्रारीदेखील अनेकांनी केल्या आहेत. मात्र, यानंतरही आरटीओकडून विनापरवाना रिक्षांविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली जात नसल्याचे दिसत आहे.
विनापरवाना रिक्षांवर चालढकल कारवाई
By admin | Published: June 18, 2017 2:22 AM