पनवेल : सिडकोविरोधात खारघरमध्ये शेकाप नगरसेवक गुरु नाथ गायकर यांनी धरणे आंदोलन पुकारले आहे. खारघर शहरातील खराब रस्ते, मलनि:सारण वाहिन्या, पदपथांची दुरवस्था आदी समस्यांबाबत सिडकोला वारंवार निवेदन देऊनही सिडको प्रशासन काहीच कारवाई करीत नसल्याने हे धरणे आंदोलन केले.
खारघर शहराची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा जास्त झाली असून, या परिसरातील समस्याही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोने शहरातील जबाबदारी झटकण्यास सुरु वात केली आहे. हस्तांतराच्या नावाखाली सिडको प्रशासन पालिकेकडे बोट दाखवत अनेक कामे अर्धवट ठेवत आहे. यासंदर्भात वारंवार निवेदन, पत्र देऊनही सिडको अधिकारी कोणतीच दखल घेत नसल्याने गायकर यांनी हिरानंदानी चौकात धरणे आंदोलन केले. या वेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार बाळाराम पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. आंदोलनाची दखल घेत शहरातील सिडकोचे अधिकारी संजय पुदाळे, संधू सागर आदीनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत सिडकोमार्फत तत्काळ शहरातील समस्यांसंदर्भात उपाययोजना राबविण्यात येतील, अशी माहिती दिली.
या वेळी आमदार बाळाराम पाटील यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला. शहरातील समस्यासंदर्भात आमदार बाळाराम पाटील यांना गुरु वारी चंद्र यांनी बैठकीचे आश्वासन दिल्यांनतर हे आंदोलन स्थगित ठेवण्यात आले. या वेळी सिडकोचे अधिकारी पुदाळे यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र दिले, यामध्ये शहरातील सेक्टर क्र मांक २,५,६,७,११,१८,१९,१६ आणि १७ पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित कामे प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविण्यात आली असल्याचे पुदाळे यांनी सांगितले. मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, अशी माहिती पुदाळे यांनी दिली.
नगरसेवक गुरु नाथ गायकर यांच्यासोबत या वेळी सुदर्शन नाईक, संतोष गायकर, जगदीश घरत, संतोष तांबोळी, रोहिदास गायकर, अशोक गिरमकर, अजित अडसुळे, प्रसाद परब, दत्ता ठाकूर हेदेखील या वेळी धरणे आंदोलनाला बसले होते.