मिनीट्रेन बंदविरोधात आंदोलन
By admin | Published: May 12, 2016 02:20 AM2016-05-12T02:20:02+5:302016-05-12T02:20:02+5:30
नेरळ-माथेरान मिनीट्रेन ८ मेपासून रेल्वे प्रशासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात बुधवारी माथेरानकरांनी दिवसभर जोरदार आंदोलन केले
माथेरान : नेरळ-माथेरान मिनीट्रेन ८ मेपासून रेल्वे प्रशासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात बुधवारी माथेरानकरांनी दिवसभर जोरदार आंदोलन केले. सर्वपक्षीय आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकवटले होते. त्यांनी सकाळी माथेरान बाजारपेठेत फिरून बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन करताच काही वेळात माथेरानची बाजारपेठ बंद झाली. त्या सर्वांनी माथेरान स्थानकात असलेली मिनीट्रेन रोखून धरण्यासाठी स्टेशन परिसरात गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत आंदोलकांनी मिनी ट्रेन माथेरान स्थानकातून जाऊ दिली नाही.
१ मे आणि ८ मे रोजी मिनीट्रेनचे प्रवासी डबे रु ळावरून खाली कोसळून अपघात झाला होता. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान मिनीट्रेन अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मिनीट्रेनला ८ मे रोजी सकाळी अपघात घडला. त्याआधी माथेरान-अमनलॉज शटलसेवा असणारी मिनीट्रेन माथेरान स्थानकात होती. त्याच दिवशी मिनीट्रेन अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शटलसेवेची मिनीट्रेन माथेरान स्थानकात राहिली होती. ती मिनी ट्रेन माथेरान येथून नेरळ लोकोमध्ये नेण्याचे काम बुधवारी (११ मे) रेल्वे करणार होती. त्याची माहिती मिळताच माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी आवाहन करून सर्वांना माथेरान रेल्वे स्थानकात एकत्र जमविले. तेथे सर्वांनी आपली मते मांडताना मिनीट्रेन कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरु झाली पाहिजे त्यासाठी आंदोलन पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय सर्व माथेरानकरांना यांना कळविला.
याआधी माथेरानच्या जनतेने आणि व्यापाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माथेरान बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि बाजारपेठ बंद केली. रेल्वे प्रशासनाने पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल यांना पाचारण केल्याने आणखी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी खासदार श्रीरंग बारणे हे नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन मिनीट्रेन पुन्हा सुरु होण्याबाबत सकारात्मक प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी माथेरान स्थानकात जमलेल्या सर्वांना आश्वस्त करताना खासदार बारणे यांनी १४ मे रोजी माथेरान मिनीट्रेनचे आंदोलन नेरळ स्टेशनवर करण्यासाठी आपण स्वत: येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आंदोलन करणारे माथेरानकर यांचा हुरूप वाढला. त्यांनी माथेरान रेल्वे स्थानकात असलेली मिनीट्रेन नेरळला नेण्यासाठी रेल्वे आंदोलनकर्ते यांच्यावर जोरदार दबाव टाकत होते.
नेरळ येथून प्रचंड पोलीस बंदोबस्त मिनी ट्रेन नेरळ येथे नेण्यासाठी मागविण्यात आला होता. या आंदोलनात महिला प्रचंड आघाडीवर होत्या, त्यांनी तर नॅरोगेज रुळावर बसून आंदोलन सुरु ठेवले. (वार्ताहर)१माथेरान मिनीट्रेनवर माथेरानचा पर्यटन व्यवसाय अवलंबून असल्याने माथेरान गिरिस्थान नगरपालिकेचे अध्यक्ष गौतम गायकवाड यांनी विशेष सभा बोलाविली. तेथे पोलीस प्रशासन आणि महसूल अधीक्षक यांना निमंत्रित करून प्रशासनाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन यांना मिनीट्रेन सुरु ठेवण्याबाबत पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला. प्रवासी माहिती केंद्र आणि प्रीपेड सेवेची सुरु वात १२ मे रोजी करण्यात येणार आहे.२त्याचवेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी घोडा वाहतूक, हात रिक्षा वाहतूक आणि मालवाहतूक यात सुसूत्रता येण्यासाठी प्रीपेड सेवा सुरु करण्यासाठी आग्रह धरला. तर माजी नगराध्यक्ष अजय सावंत आणि सदस्य संतोष पवार यांनी प्रवासी माहिती केंद्र सुरु करून पर्यटक यांना खरी माहिती देण्यासाठी पुढाकार प्रशासनाने घ्यावा अशी सूचना केली.