घणसोली पामबीचसाठी हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:43 AM2018-05-30T01:43:41+5:302018-05-30T01:43:41+5:30

खारफुटीमुळे मागील ९ वर्षांपासून रखडलेल्या घणसोली ते ऐरोली दरम्यानच्या पामबीच मार्गासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत

Movement for Ghansali pond | घणसोली पामबीचसाठी हालचाली

घणसोली पामबीचसाठी हालचाली

Next

नवी मुंबई : खारफुटीमुळे मागील ९ वर्षांपासून रखडलेल्या घणसोली ते ऐरोली दरम्यानच्या पामबीच मार्गासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मंगळवारी खासदार राजन विचारे यांनी अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या या मार्गाची पाहणी केली.
सिडकोने २00९ मध्ये तीन-तीन लेनचा ३ किमी लांबीचा घणसोली-ऐरोली पामबीच मार्ग घणसोलीपर्यंत तयार केला. त्यापुढील टप्प्यात मोठ्याप्रमाणात खारफुटी असल्याने या मार्गाचे काम रखडले. पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी मागील ९ वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले आहे. घणसोली नोड सिडकोकडून हस्तांतरित झाल्यानंतर महापालिकेने या रस्त्याच्या कामासाठी पुढाकार घेतला. या मार्गावर केबल स्टे ब्रिज बांधण्यासाठी महापालिकेने ८00 कोटीरुपयांचा आराखडा तयार केला. परंतु हा ब्रिज अत्यंत खर्चीक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रस्तावित पूल एलिव्हेटेड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी २५0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. असे असले तरी कांदळवनाचा अडथळा दूर होणे गरजेचे असल्याने खासदार राजन विचारे यांनी आता पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी त्यांनी कांदळवन विभागाचे आयुक्त वासुदेवन यांच्यासोबत या रस्त्याची पाहणी करून त्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले. एलिव्हेटेड ब्रिज बांधल्यास शहराअंतर्गत असलेली वाहतूक या मार्गे वळवू शकतील व ठाणे - बेलापूर मार्गावरील ऐरोली रेल्वे ब्रिजखालील वाहतूककोंडीला आळा बसणार आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात वाहतूककोंडी कमी होईल असे कांदळवन आयुक्त वासुदेवन यांना पटवून दिले. वासुदेवन यांनी रखडलेल्या या मार्गाच्या कामाला परवानगी देण्याबाबत अनुकूलता दर्शविल्याचे राजन विचारे यांनी सांगितले. महापालिकेने तशा आशयाचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेला घणसोली-ऐरोली पामबीच मार्ग दृष्टिपथात दिसू लागला आहे.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, गटनेते द्वारकानाथ भोईर, नगरसेवक चेतन नाईक, राजू कांबळे, ममित चौगुले, जगदीश गवते, सुरेश सकपाळ तसेच एम. एस. बोटे, पंडित राव उपस्थित होते.

Web Title: Movement for Ghansali pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.