नवी मुंबई : विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या समस्यांवरून मनसेच्या शिष्टमंडळाने पालिका शहर अभियंत्यांच्या कार्यालयात आंदोलन केले. यावेळी नाट्यगृहाच्या सुधारासाठी केलेल्या पत्रव्यवहाराच्या तसेच छायाचित्रांच्या पताका करून त्या कार्यालयात बांधण्यात आल्या. अखेर दोन दिवसांत नाट्यगृहाच्या दुरुस्तीकामाच्या प्रक्रियेला सुरवात करण्याचे आश्वासन शहर अभियंत्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.सिडकोने बांधलेल्या व सध्या महापालिकेच्या ताब्यात असलेल्या वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सध्या प्रेक्षक व नाट्यकर्मी यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. छतातून पाण्याची गळती, भिंतीला तडे जाणे, स्लॅबला अडकवलेले टेलीक्लाइंबर पडणे असे प्रकार त्याठिकाणी सातत्याने घडत आहेत. याचा त्रास नाट्यरसिक व नाट्यकर्मी या दोन्ही वर्गाला सहन करावा लागत आहे. पालिकेने भावे नाट्यगृहाच्या डागडुजीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी मनसेकडून वारंवार केली जात आहे. मात्र अनेक निवेदने देवूनही ठोस कामाऐवजी तात्पुरती मलमपट्टीची कामे केली जात असल्यामुळे नाट्यगृहातल्या समस्या अद्यापही पूर्णपणे सुटलेल्या नाहीत. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पालिकेचे शहर अभियंता मोहन डगावकर यांच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी डगावकर यांच्या कार्यालयात प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. तसेच आजपर्यंत केलेल्या पत्रांचे व नाट्यगृहातील दुरवस्थेच्या छायाचित्रांच्या पताका तयार करून त्या कार्यालयात बांधण्यात आल्या. अखेर डगावकर यांनी दोन दिवसांत नाट्यगृहाच्या दुरुस्तीकामाला सुरवात करण्याचे लेखी आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
नाट्यगृहाच्या समस्येवरून मनसेचे आंदोलन
By admin | Published: April 27, 2017 12:14 AM