पाणी टंचाईविरोधात नवी मुंबई विकास आघाडीचे आंदोलन; नेरूळ कार्यालयावर मोर्चा
By नामदेव मोरे | Published: August 29, 2023 07:31 PM2023-08-29T19:31:45+5:302023-08-29T19:32:22+5:30
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील झोपडपट्टी परिसरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील झोपडपट्टी परिसरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गरजेपुरतेही पाणी मिळत नसल्यामळे संतापलेल्या नागरिकांनी नवी मुंबई विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली नेरूळ विभाग कार्यालयावर मोर्चा काढला. पाणी समस्या तत्काळ न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
रिपब्लीकन सेना, घर हक्क संघर्ष समीती, शेकाप, जनता दल सेक्युलर, समाजवादी पार्टी, आरपीआय खरात गट व इतर राजकीय, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते. महात्मा गांधी नगर, रमेश मेटल क्वारी, आंबेडकर नगर झोपडपट्टी परिसरामधील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहरात इतर ठिकाणीही पाणी समस्या गंभीर झाली आहे. वारंवार निवेदन करूनही पाणी समस्या सोडविली जात नाही. नेरूळ विभाग कार्यालयामध्ये वारंवार हेलपाटे मारूनही या समस्येकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकांनी मोर्चा काढला होता.
झोपडपट्टी परिसरातील पाणी समस्या तत्काळ सोडविण्यात यावी अशी मागणी यावेळी केली. या व्यतिरिक्त पथदिवे, पदपथ, आरोग्य सुविधा, प्रसाधनगृह व इतर समस्या सोडविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मोर्चामध्ये खाजामिया पटेल, चंद्रशेखर रानडे, सलिम मुल्ला, बाबा न्यायनीत, अशोक जमादार, प्रकाश वाकोडे, महेंद्र वर्मा, दिपा बम, संगीता चौधरी, प्रकाश वानखेडे, दादा भालेराव, कैलाश सरकटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.