पनवेलमध्ये तलाठ्यांचे आंदोलन, काळी फित लावून होणार कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 04:52 AM2018-02-04T04:52:47+5:302018-02-04T04:52:54+5:30
जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील तलाठी योगेश रमेश पाटील कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी १२ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात लेखणी बंद आंदोलन चालू आहे.
पनवेल : जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील तलाठी योगेश रमेश पाटील कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी १२ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात लेखणी बंद आंदोलन चालू आहे. अद्यापही आरोपीना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे त्याचा निषेध म्हणून शनिवारी निवासी नायब तहसीलदार बी. टी. गोसावी यांना निवेदन देण्यात आले. तसेच ५ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात काळ्या फिती लावून कामकाज होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी काळी फित लावून कामकाज होईल, असेही पनवेल तालुका तलाठी संघटनेमार्फत दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.
तलाठी योगेश पाटील यांना मारहाण झाल्यानंतर निवेदन देऊन झाले, महसूलमंत्री यांच्याशी बोलून झाले, विभागीय आयुक नाशिक यांची भेट घेऊन चर्चा झाली. परंतु अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्याचा निषेध म्हणून ७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, तरीही मागणी पुर्ण झाली नाही तर ९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. यानंतरही मागणी पुर्ण झाली नाही तर राज्यात संपूर्ण लेखणी बंद आंदोलन मागणी पुर्ण होईपर्यंत चालू ठेवण्याची भूमिका घेण्यात येईल असा निर्णय राज्य संघाचे वतीने घेतला आहे असे निवेदनात नमूद केले आहे.