पारगाव ग्रामस्थांचे आंदोलन; सिडकोकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 03:48 AM2018-02-14T03:48:32+5:302018-02-14T03:48:43+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील मौजे पारगाव-डुंगी येथील भूविकासाचे काम वाटपामध्ये केवळ डुंगी गावाचे नाव दर्शविले आहे. त्यामुळे पारगाव गावाचे रहिवासी म्हणून आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे.
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील मौजे पारगाव-डुंगी येथील भूविकासाचे काम वाटपामध्ये केवळ डुंगी गावाचे नाव दर्शविले आहे. त्यामुळे पारगाव गावाचे रहिवासी म्हणून आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे. ५० टक्के माती भरावाची कामे मिळाली पाहिजेत, यासाठी पारगाव येथील ग्रामस्थांनी भरावाची कामे थांबविण्याससाठी मंगळवारी आंदोलन केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलन थांबवले. या वेळी ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.
विमानतळ गाभा क्षेत्रातील सिडकोने निश्चित केलेल्या कामाच्या वाटपामध्ये केवळ डुंगी या गावाचे नाव दर्शवले आहे. डुंगी गावातील प्रकल्पबाधितांच्या चार सोसायट्यांना कामाच्या वर्कआॅर्डरदेखील दिलेल्या आहेत.
वास्तविक या भूसंपादित झालेल्या जमिनींमध्ये पारगाव गावच्या प्रकल्पबाधितांच्या जमिनीचे प्रमाण जवळपास ९५ टक्केपेक्षा अधिक असताना आमच्या गावाच्या सोसायट्यांना या कामामध्ये घेतलेले नाही. ही गंभीर स्वरूपाची चूक असून सिडकोसोबत वेळोवेळी बैठका घेऊन देखील आजपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सिडको अन्याय करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी या वेळी केला.
या कामांमुळे पारगावच्या सर्व बाजूंनी किमान ८ मीटर उंचीचा भराव होणार आहे. त्यामुळे गावाच्या पुनर्वसनाबाबत व नागरी सुविधांबाबत गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. याबाबत सिडको जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तीन दिवसांत न्याय देण्याची मागणी
शासन निर्णयाप्रमाणे ५० टक्के मातीच्या भरावाच्या कामाचा कायदेशीर हक्क मिळावा, अन्यथा येथील भूविकासाचे काम थांबवावे लागेल, असा इशारा पारगाव ग्रामस्थांनी दिला आहे.
तीन दिवसांत ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
या आंदोलनात शेकडो महिला, पुरु ष आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.