पनवेलमध्ये शांततेत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:44 PM2019-12-20T22:44:09+5:302019-12-20T22:44:50+5:30
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध : निषेध फलक झळकावून घोषणाबाजी
कळंबोली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत मंजूर करून पास करण्यात आला. परंतु कायद्याविरोधाचे देशभरातील वातावरण तापले आहे. शुक्रवारी पनवेल शहरातील मुस्लीम समाजाने कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन केले. या वेळी पाच हजारांपेक्षा जास्त मुस्लीम बांधव उपस्थित होते.
तळोजात या कायद्याविरोधात दोन दिवसांपूर्वी मुस्लीम बांधव रस्त्यावर उतरले होते. शुक्रवारी पनवेल शहरातील पटेल, कच्छी मोहल्ला, मुस्लीम नाका, भारतनगर येथील मुस्लिमांनी आंदोलन केले. त्यांनी महापालिकेच्या मैदानावर केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. वेगवेगळे फलक झळकावून कायद्याला विरोध केला.
कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून पनवेल शहर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे मुस्लीम बांधवांचा मोर्चा पनवेल महापालिकेजवळ थांबला. त्यामुळे तो तहसील कार्यालयापर्यंत जाऊ शकला नाही. शिष्टमंडळाने जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले.
केंद्र शासनाने नागरिकत्वाची जी दुरुस्ती केली आहे ती भारतीयांवर अन्यायकारक आहे. याबाबत अगोदर जनजागृती करणे गरजेचे होते. तसे न करता बहुमताच्या जोरावर हा कायदा पास करण्यात आला; याबाबत लोकांना कोणतीही माहिती नाही. तसेच त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने आम्ही आंदोलन केले.
बहुजन क्रांती मोर्चातर्फे धरणे
पनवेल : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पोलीस चौकीजवळ बहुजन क्रांती मोर्चातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन शुक्रवारी करण्यात आले. शहरातील शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करून बहुजन क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी कॅब आणि एनआरसीच्या विरोधात घोषणा दिल्या. हा कायदा म्हणजे संविधानाचे उल्लंघन असल्याचे या वेळी सांगण्यात आले. - लतीफ शेख, अध्यक्ष, पनवेल शहर काँग्रेस
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर
पोलीस यंत्रणा सज्ज
नवी मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलने होत असताना नवी मुंबईतदेखील कायद्याच्या समर्थनार्थ तसेच विरोधात रॅली होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी यंत्रणा सज्ज केली असून आंदोलकांना शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचेही आवाहन पोलिसांनी केले आहे. देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलने होत असून त्यास हिंसक वळण लागत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात १५ हून अधिक राज्यांत अल्पसंख्याक समुदाय रस्त्यावर उतरत आहे. त्यानुसार नवी मुंबईतदेखील शनिवारी नेरूळ येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.