मुंबई - गोवा महामार्गावर शेकापचे आंदोलन
By admin | Published: July 12, 2016 02:50 AM2016-07-12T02:50:35+5:302016-07-12T02:50:35+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जून २३ तारखेपासून जुलैपर्यंत पडलेल्या २० दिवसांच्या पावसात राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडून रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
पेण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर जून २३ तारखेपासून जुलैपर्यंत पडलेल्या २० दिवसांच्या पावसात राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडून रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. कोकणची जीवनवाहिनी असलेला महामार्गावरील खड्डे व रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, कोकणातील चाकरमान्यांचा व स्थानिकांचा प्रवास सुखरूप व्हावा, याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने रस्त्याच्या कडेला मानवी साखळी उभारून महामार्गावर तरणखोल ते वडखळपर्यंत सोमवारी सकाळी ८.३० ते १२ वाजेपर्यंत आ. धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली मानवी साखळी आंदोलन छेडीत शासनाला महामार्गाच्या दुरवस्थेची जाणीव करून दिली.
पेणमधील जिते-तरणखोल-हमरापूर फाटा ते पेण रेल्वे स्थानक, वाशीनाका, वडखळ या १५ किमीच्या टप्प्यात भरपावसात शेकाप कार्यकर्त्यांनी ३,५०० ते ४,००० च्या आसपास मानवी साखळी उभारून महामार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना छत्र्या, केळी, पाण्याच्या बॉटल व महामार्गाच्या अवस्थेबाबतचा तपशील असलेल्या निवेदनाच्या प्रती प्रत्येक वाहनचालकांना दिल्या. कार्यकर्त्यांचा हा उत्साह पेणच्या टप्प्यात जागोजागी दिसून येत होता. अभिनव पद्धतीच्या या आंदोलनाने वाहनचालकही भारावून गेले. कुठेही वाहतूक व्यवस्थेला जराही अडसर न करता केलेले हे आंदोलन पहिल्यांदाच महामार्गावर झाले आहे. शेकापचे पंचायत समिती सभापती मारु ती कदम, शेकाप नेत्या अॅड. नीलिमा पाटील, महिला आघाडीच्या शीतल ठाकूर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रमोद पाटील, यशवंत म्हात्रे, जयप्रकाश ठाकूर, उपसभापती प्रफुल्ल म्हात्रे, रोडे सरपंच स्वप्निल पाटील, संदेश ठाकूर, लाल ब्रिगेड, पुरोगामी आघाडी, शेकाप माजी सभापती संजय भोईर, सुनील गायकर यांच्यासह सरपंच, विविध कमिट्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सहभाग होता.
या आंदोलनाची रूपरेषा शेकापच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी तयार केली होती. पावसाळी अधिवेशनात या प्रश्नावर शेकाप सभागृहात आक्रमक होईल, असे धैर्यशील पाटील यांनी याप्रसंगी सांगितले, तर मोर्चाच्या तयारीची सर्वस्वी जबाबदारी महादेव दिवेकर व संजय डंगर यांनी यशस्वीपणे सांभाळली. (वार्ताहर)