- नामदेव मोरे नवी मुंबई : रोहा तालुक्यातील सूरगड किल्ला संवर्धनासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानने आठ वर्षांपासून चळवळ सुरू केली आहे. शिवप्रेमी तरुण सुट्टीच्या दिवशी गडावर जाऊन स्वच्छता मोहिमेसह ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना यश येऊ लागले असून गडाला भेट देणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.महाराष्ट्रातील काही प्रमाणात दुर्लक्षित राहिलेल्या गड - किल्ल्यांमध्ये सूरगडचा समावेश होतो. गडाचा ऐतिहासिक ठेवा घेरा सूरगड व परिसरातील नागरिकांनी जपला आहे. साधारणत: दहा वर्षांपासून दुर्गवीर प्रतिष्ठान या संस्थेने गडाच्या संवर्धनासाठी काम सुरू केले आहे. प्रतिष्ठानशी जोडले गेलेले शिवप्रेमी तरुण सुट्टीच्या दिवशी गडावर जाऊन श्रमदानातून विकासाचे काम करत आहेत. गडावर जाणारे वाट चुकू नयेत यासाठी मार्गदर्शक फलक लावले आहेत. घेरा सूरवाडीपासून गडावर जात असताना सुरवातीलाच जंगलातील तोफ, मंदिर यांची माहिती येणाºया नागरिकांना मिळावी यासाठीही फलक लावण्यात आले आहेत. गडावर खडक फोडून पाण्याच्या टाक्या तयार केल्या आहेत. या टाक्यांची साफसफाई करण्यात आली आहे. यामुळे येथे येणाºया पर्यटकांना येथील पाणी पिण्यासाठी वापरता येत आहे.गडाच्या एका टोकावर शिलालेख आढळतो. त्यावर हा किल्ला कोणी बांधला, किल्ला बांधणाºयाचे व सुभेदाराचे नाव कोरण्यात आले आहे. गडाची संरक्षण भिंत अजून सुस्थितीमध्ये आहे. गडावर मारुतीचे व देवीचे मंदिर आहे. गडावरून कुंडलिका नदीचे चंद्राच्या कोरीप्रमाणे पात्र दिसत आहे. गडावर फिरण्यासाठीच्या वाटा व्यवस्थित करण्याचे काम दुर्गवीरच्या माध्यमातून केले जात असून त्यामुळे गडावर येणाºया पर्यटकांना सहजपणे येथील माहिती उपलब्ध होत आहे. प्रतिष्ठानचे प्रमुख संतोष हासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. रविवारी झालेल्या मोहिमेमध्ये सचिन रेडेकर, अल्पेश पाटील, संदीप गावडे, मंगेश पडवळ, प्रशांत डिंगणकर, गणेश माने, मनोज कुळे, अभिजित विचारे, विशाल इंगळे, विठ्ठल केमळे हे सहभागी झाले होते. दिवसभर सदरेच्या दोन्ही बाजूचे मातीचे ढिगारे बाजूला करण्यात आले.>गडाचा इतिहाससूरगड दक्षिण शिलाहार राजाच्या काळात बांधला असावा असा अंदाज आहे. १७३३ मध्ये शंकर नारायण यांनी सिद्दीकडून गड जिंकून घेतला होता. त्यावेळी सूरगडावर कैद्यांना ठेवण्यात येत होते असा उल्लेख आहे. गडावर जाणाºया वाटेवर एक मोठी तोफ व मंदिरात अर्धवट तुटलेली तोफ पाहावयास मिळते. गडावर पाण्याचे टाके, मंदिर, कोठार, सदर, शिलालेख पाहावयास मिळत आहे.>अशी चालते मोहीमशिवप्रेमी तरुण सुट्टीच्या दिवशी पहाटे आवश्यक ती अवजारे घेऊन गडावर जातात. वाढलेले गवत काढतात. ऐतिहासिक वास्तूच्या परिसरातील मातीचे ढिगारे बाजूला करतात. स्वच्छता करतात व गडावर फिरण्याच्या वाटा व्यवस्थित करत असून दहा वर्षांपासून सातत्याने ही कामे सुरू आहेत.
शिवप्रेमींची रोह्यातील सूरगड संवर्धनासाठी चळवळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 11:29 PM