शिवसेनेचे महापालिका मुख्यालयात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2015 12:10 AM2015-08-22T00:10:25+5:302015-08-22T00:10:25+5:30
सर्वसाधारण सभेमध्ये सचिवांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी पालिका मुख्यालयामध्ये आंदोलन केले.
नवी मुंबई : सर्वसाधारण सभेमध्ये सचिवांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी पालिका मुख्यालयामध्ये आंदोलन केले. सचिवांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली. प्रभाग समित्यांची रचना चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप केला आहे.
गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये तातडीचे कामकाज म्हणून प्रभाग समित्यांच्या रचनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आला. परंतु तहकूब सभेमध्ये तातडीचे कामकाज घेता येत नसल्याचा आक्षेप शिवसेनेचे नामदेव भगत व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी घेतला होता. त्यानंतरही प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सचिव चित्रा बाविस्कर यांनी उपमहापौरांचा माईक घेऊन प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगितले. विरोधकांनी नियमांची माहिती मागितल्यानंतरही दिली नाही. दिघा, ऐरोली व घणसोलीमधील प्रभाग समितीची रचना राष्ट्रवादी काँगे्रसला फायदेशीर होईल अशाप्रकारे केली आहे. प्रभाग समित्यांची रचना करताना भौगोलिक रचनेकडे दुर्लक्ष केल्याचा आणि पक्षपातीपणा केल्याचाही आरोप नगरसेवकांनी केला.
महापालिका मुख्यालयामध्ये शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. सचिवांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन सचिवांच्या पक्षपातीपणाची तक्रार करण्यात आली. नियमबाह्य कामकाज सुरू असून सर्व कामकाजाचे व्हिडीओ चित्रीकरण उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या प्रकरणी संबंधितांवर योग्य कारवाई झाली नाही तर शासनाकडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला. आयुक्तांनी प्रभाग समितीची रचना व इतर कामकाज नियमाप्रमाणे झाले आहेत का, याची माहिती घेऊन उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नामदेव भगत, शिवराम पाटील, मनोज हळदणकर, सोमनाथ वास्कर, काशिनाथ पवार, रतन मांडवे, सुमित्र कडू, समीर बागवान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.