उरणच्या शासकीय कार्यालयात सापांचा वावर, कार्यालयं इतरत्र हलविण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 03:22 AM2017-09-18T03:22:36+5:302017-09-18T03:23:17+5:30
उरण तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील इमारतीमधील वाढत्या सापांच्या वावरामुळे शहरातील कार्यालय इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भीतीग्रस्त कर्मचा-यांच्या लेखी पत्राद्वारे केलेल्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
उरण : उरण तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील इमारतीमधील वाढत्या सापांच्या वावरामुळे शहरातील कार्यालय इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भीतीग्रस्त कर्मचा-यांच्या लेखी पत्राद्वारे केलेल्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
विविध शासकीय कार्यालयांचे कामकाज चालणा-या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जुन्या इमारतीमध्ये सध्या सापांचा संचार वाढत आहे. सापांच्या कार्यालयातील वाढत्या वावरामुळे कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण असून भीतीमुळे गर्भगळीत झालेले अनेक कर्मचारी तकलादू कारणे देवून कार्यालयाकडे फिरकेनासे झाले आहेत. यामुळे मात्र संबंधित शासकीय कार्यालयात काम असणा-या नागरिकांना कामासाठी वारंवार पायपीट करण्याची पाळी येवून ठेपली आहे. यामुळे त्यांचा वेळही जात आहे.
उरण शहरात रेवस-करंजा प्रकल्प उभारण्याच्या कामकाजासाठी दोन इमारती उभारण्यात आल्या होत्या. हा प्रकल्प जरी मार्गी लागला नसला तरी या ३० वर्षे जुन्या इमारती सध्या विविध शासकीय विभागाच्या कार्यालयासाठी देण्यात आल्या आहेत. तलाठी कार्यालये, वन विभाग, तालुका कृषी विभाग, मत्स्य विभाग आदि शासकीय विभागाचे कामकाज या इमारतीतून चालते. याआधीच या दोन्ही इमारती जीर्ण आणि धोकादायक बनल्या आहेत. तरीही धोकादायक इमारतीमधील कार्यालयामधूनच कर्मचारी जीव मुठीत काम करीत आहेत. त्यातच इमारतीच्या सभोवार असलेली झाडेझुडपे आणि पावसाचे साचलेल्या पाण्यामुळे परिसरात साप आणि सरपटणा-या प्राण्यांचा वावर वाढला आहेत.
अशा या सापांनी आता इमारतीतील शासकीय कार्यालयातच बस्तान मांडले आहे. फाईली आणि दप्तराखाली, कानाकोप-यात कर्मचा-यांना साप आढळून येऊ लागले आहे. कार्यालयात सापच साप दिसू लागल्याने भीतीने गर्भगळीत झालेले कर्मचारीही आता भयभीत झाले आहेत. सापांच्या वावरांमुळे भीतीने ग्रासलेले कर्मचारी आणि विविध बहाणे करून इमारतीतील कार्यालयाबाहेर वेळ काढणे पसंत करू लागले आहेत.
या दोन्ही इमारती सध्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित आहेत.
या दोन्ही इमारतींच्या स्लॅबला गळती लागलेली आहे. छताला प्लास्टिक लावून कर्मचारी काम करीत आहेत. छतातून टपकणा-या पाण्यापासून महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी कर्मचा-यांना ब-याचदा कसरत करावी लागते. दोन्ही इमारतींचे तळमजले तर बंदच ठेवण्यात आले आहेत. येथे सापांची घरे आढळल्याने कर्मचारी भयभीत झाले आहेत.
>तळमजल्यावर सापांची घरे
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या दोन्ही इमारतींच्या बंद तळमजल्यात सापांनी घरे केली असल्याचे कर्मचा-यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे या इमारतींमधून शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्याची मागणी शासकीय कर्मचा-यांकडून वरिष्ठांकडे करण्यात आली होती.
कर्मचा-यांच्या मागणीनंतर आणि येथील परिस्थिती पाहून काही कार्यालये इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची महिती अधिकृत सूत्रांनी दिली. या निर्णयामुळे कर्मचा-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.